"पक्ष संकटात असताना कुठे होता?; ओमराजे आणि संजय दिना पाटलांवर राऊतांचा घणाघात"

"पक्ष संकटात असताना कुठे होता?; ओमराजे आणि संजय दिना पाटलांवर राऊतांचा घणाघात"

मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील खासदारांच्या भूमिकांवरून राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा रंगली आहे. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या वडिलांशी संबंधित न्यायालयीन प्रकरणाचा निकाल लागल्यानंतरच भूमिका स्पष्ट करणार असल्याचे म्हटले होते. मात्र या वक्तव्यावरून खासदार संजय राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

पत्रकारांशी संवाद साधताना राऊत म्हणाले, "ज्या पक्षाने तुम्हाला आमदार आणि दोन वेळा खासदार केलं, त्या पक्षावर संकट आलं असताना वेळ काढणं अपेक्षित होतं. कोर्ट काही घरात भरत नाही. पक्ष अडचणीत असताना नेत्यांनी जबाबदारीने वागायला हवं."दरम्यान, शिवसेनेच्या महत्त्वाच्या बैठकीसाठी व्हीप जारी करण्यात आला होता. मात्र नऊपैकी फक्त तीन खासदार बैठकीला उपस्थित राहिल्याने पक्षांतर्गत नाराजी वाढल्याची चर्चा आहे. या बैठकीला ओमराजे निंबाळकर आणि मुंबई उत्तर-पूर्वचे खासदार संजय दिना पाटील उपस्थित राहतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती.

याचवेळी संजय राऊत यांनी संजय दिना पाटील यांच्यावरही निशाणा साधला. "संजय दिना पाटील हे शिवसेनेच्या बळावर निवडून आले. त्यांना पक्ष सोडण्याचं कोणतंही ठोस कारण नव्हतं. पक्षाने त्यांना भरभरून दिलं, मात्र पक्ष संकटात असताना त्यांनी अपेक्षित भूमिका घेतली नाही," असा आरोप राऊत यांनी केला.

तसेच त्यांनी दिना पाटील यांच्या अनुपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, "दिल्लीतील बैठकीला ते का आले नाहीत? आम्ही त्यांची वाट पाहत होतो. पक्ष अडचणीत असताना जे उपस्थित राहिले नाहीत, त्यांनी आता शहाणपणाचे सल्ले देऊ नयेत," असा टोला लगावला.या सर्व घडामोडींमुळे ठाकरे गटातील खासदारांच्या भूमिकांबाबतच्या चर्चांना आणखी उधाण आले असून, आगामी काळात या वादावर कोणती भूमिका स्पष्ट होते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.