सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र' हेच मिशन; तुकाराम मुंढेंनी स्पष्ट केली कारवायांमागची भूमिका

सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र' हेच मिशन; तुकाराम मुंढेंनी स्पष्ट केली कारवायांमागची भूमिका

मुंबई (प्रतिनिधी) : अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपण नेहमी कायद्याच्या चौकटीत राहून काम करत असल्याचं स्पष्ट केलं आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी विभागाच्या कारवायांमागील भूमिका आणि उद्दिष्टांबाबत सविस्तर माहिती दिली.मुंढे म्हणाले, कोणत्याही पदावर रुजू झाल्यानंतर त्या पदाची जबाबदारी आणि उद्देश आधी समजून घेतो. 'सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र' हेच आमचं मिशन आहे. नागरिकांना सुरक्षित अन्न आणि औषध मिळणं ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे.

ते पुढे म्हणाले की, सुरक्षित अन्न पुरवण्याची जबाबदारी व्यावसायिकांची असली, तरी नियमांचं पालन होत आहे की नाही, यावर लक्ष ठेवणं हे अन्न व औषध प्रशासन विभागाचं काम आहे. जे नियमांचं पालन करतील, त्यांना घाबरण्याचं कारण नाही. मात्र नियम मोडणाऱ्यांवर निश्चित कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

कारवायांबाबत बोलताना मुंढे यांनी सांगितलं की, नागरिकांच्या तक्रारी, गुप्त माहिती आणि उपलब्ध डेटाचा अभ्यास करूनच छापे आणि कारवाया केल्या जातात.यावेळी त्यांनी नागरिकांनाही जागरूक राहण्याचं आवाहन केलं. फक्त किंमत आणि एक्सपायरी डेट पाहून चालणार नाही. उत्पादनावरील माहितीही वाचली पाहिजे. आपण काय खातो आणि पितो, यावरच आपल्या आरोग्याचा पाया अवलंबून असतो, असं ते म्हणाले.

शिक्षणासोबतच संस्कारही तितकेच महत्त्वाचे असल्याचं सांगताना, आयुष्यात आलेल्या प्रत्येक संकटात कुटुंबाने साथ दिल्याचाही उल्लेख तुकाराम मुंढे यांनी केला.