नियतीचा घाला; 15 जूनला घरी यायचं होतं; लेकाच्या पहिल्या वाढदिवसाआधीच वडिलांचे वीरमरण

नियतीचा घाला; 15 जूनला घरी यायचं होतं; लेकाच्या पहिल्या वाढदिवसाआधीच वडिलांचे वीरमरण

 मुंबई (प्रतिनिधी) : जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमधून महाराष्ट्रासाठी अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. बारामुल्ला जिल्ह्यातील एका लष्करी तळावर झालेल्या दुर्दैवी हँड ग्रेनेड स्फोटात महाराष्ट्राच्या दोन जवानांना वीरमरण आले. शहीद जवानांची नावे अर्जुन जाधव आणि विक्रम बाळकृष्ण चव्हाण अशी असून, ते दोघेही 8 Rashtriya Rifles मध्ये कार्यरत होते. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

शहीद अर्जुन जाधव हे सातारा जिल्ह्यातील रहिवासी होते, तर विक्रम चव्हाण हे नवी मुंबईतील ऐरोली येथील होते. उरीमधील कमलकोट परिसरातील लष्करी छावणीत सायंकाळी साडेचारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. छावणीत शस्त्रास्त्रांच्या तपासणी व हस्तांतरणाची नियमित प्रक्रिया सुरू असताना अचानक एका हँड ग्रेनेडचा स्फोट झाला. स्फोट इतका भीषण होता की अर्जुन जाधव आणि विक्रम चव्हाण हे दोघेही गंभीर जखमी झाले.

घटनेनंतर लष्कराने तातडीने दोन्ही जवानांना हवाई मार्गाने श्रीनगरमधील लष्करी रुग्णालयात हलवले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. हा स्फोट नेमका कशामुळे झाला, याचा तपास सुरू असून लष्कराकडून कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील शहापूर गावचे सुपुत्र अर्जुन जाधव यांची कहाणी सर्वांच्या डोळ्यांत पाणी आणणारी आहे. अर्जुन हे 'बॉम्बे इंजिनीअरिंग ग्रुप' मध्ये कार्यरत होते. त्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण काही दिवसांवर येऊन ठेपला होता. येत्या २५ जून रोजी त्यांच्या एकुलत्या एका मुलाचा पहिला वाढदिवस होता. हा दिवस कुटुंबासोबत मोठ्या आनंदात साजरा करण्यासाठी त्यांनी अनेक योजना आखल्या होत्या.

या वाढदिवसासाठी अर्जुन जाधव १५ जूनपासून सुट्टी घेऊन गावी येणार होते. मुलाच्या पहिल्या वाढदिवसाची तयारी घरात सुरू झाली होती. आई-वडील, पत्नी आणि संपूर्ण कुटुंब त्यांच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत होते. मात्र, नियतीला काही वेगळेच मान्य होते. घरी परतण्यास अवघे दहा दिवस बाकी असताना देशसेवेच्या कर्तव्यात असतानाच त्यांना वीरमरण आले. आपल्या मुलाचा पहिला वाढदिवस साजरा करण्याचे त्यांचे स्वप्न अपुरेच राहिले आणि संपूर्ण गावावर शोककळा पसरली.