"आम्ही 'व्हायरस' नाही तर 'व्हॅक्सीन'!" शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांवर अभिजीत दिपकेंचा छत्रपती संभाजीनगरमधून घणाघात

"आम्ही 'व्हायरस' नाही तर 'व्हॅक्सीन'!" शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांवर अभिजीत दिपकेंचा छत्रपती संभाजीनगरमधून घणाघात

छत्रपती संभाजीनगर: "देशातील केवळ एका परीक्षेचा पेपर फुटलेला नाही, तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेमध्येच दोष निर्माण झाले आहेत. हे दोष दूर करण्यासाठी गेल्या १६ दिवसांपासून दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलन सुरू आहे. शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी आंदोलन करणारी ही तरुण मंडळी 'व्हायरस' नाही, तर या व्यवस्थेला लागलेली कीड दूर करणारी 'व्हॅक्सीन' आहे," असे रोकठोक मत कॉक्रोच जनता पक्षाचे (कोजप) प्रमुख अभिजीत दिपके यांनी येथे व्यक्त केले.

छत्रपती संभाजीनगर शहरातील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य आंदोलनात ते बोलत होते. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. सोमवारी दुपारी रिमझिम पाऊस सुरू असतानाही मराठवाड्यातील हजारो स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

"केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी आत्मपरीक्षण करावे"
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर जोरदार टीका करताना अभिजीत दिपके म्हणाले, "नीट (NEET) च्या पेपरफुटीनंतर देशभरात नैराश्यातून २० हून अधिक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. या दुर्दैवी मृत्यूंना केंद्र सरकारच जबाबदार आहे. असे असताना शिक्षणमंत्री आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना 'आंतकवादी' म्हणत आहेत. आम्हाला आंतकवादी म्हणण्यापूर्वी तुम्ही स्वतःच्या कारभाराचे आत्मपरीक्षण करावे." देशातील शिक्षण व्यवस्था पूर्णपणे सडली असून, हा केवळ एका परीक्षेचा किंवा विद्यार्थ्यांचा प्रश्न नाही, असे सांगत हा लढा तीव्र करण्यासाठी मराठवाड्यातूनही दिल्लीच्या जंतरमंतरवरील आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. दिपके यांनी आपल्या भाषणाची सुरुवात 'जय भीम' चा नारा देऊन केली, ज्याला उपस्थित तरुणांनी मोठा प्रतिसाद दिला.

एमपीएससी परीक्षा ऑफलाईन घेण्याची मागणी
या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) वतीने घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षा ऑनलाईन न घेता, त्या पूर्वीप्रमाणेच 'ऑफलाईन' पद्धतीने पारदर्शकपणे घ्याव्यात, अशी आग्रही मागणी केली. शिक्षक पात्रता परीक्षेचा (TET) पेपर फुटल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला रोष व्यक्त करण्यासाठी आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने हे आंदोलन करण्यात आले.

आंदोलनानंतर पुन्हा दिल्लीला जाणार: रोहित पवार
 या वेळी बोलताना आमदार रोहित पवार यांनी राज्यातील आणि देशातील विविध परीक्षांमध्ये झालेल्या घोटाळ्यांवर सडकून टीका केली. "शेतकरी कर्जमाफीच्या आंदोलनानंतर आम्ही पेपरफुटीच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आज हे आंदोलन करण्यात आले आहे," असे ते म्हणाले. या आंदोलनानंतर आपण पुन्हा दिल्लीला जाणार असून, शिक्षण व्यवस्थेत मोठे बदल घडवून आणण्यासाठी हा संघर्ष सुरूच राहील, असा निर्धार नेत्यांनी व्यक्त केला.