कोल्हापुरात स्मार्ट मीटरविरोधात ठाकरे गट आक्रमक! 'जबरदस्ती थांबवा, अन्यथा...'; महावितरणला थेट इशारा

कोल्हापुरात स्मार्ट मीटरविरोधात ठाकरे गट आक्रमक! 'जबरदस्ती थांबवा, अन्यथा...'; महावितरणला थेट इशारा

कोल्हापूर/ प्रतिनिधी : शहरात महावितरणकडून सुरू असलेल्या स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रस्त्यावर उतरला आहे! "नागरिकांना विश्वासात न घेता सुरू असलेली ही हुकूमशाही आणि मनमानी जोडणी तात्काळ थांबवा," असा आक्रमक पवित्रा घेत ठाकरे गटाने महावितरणला थेट आणि कडक इशारा दिला आहे.

शिवसेना शहरप्रमुख विशाल देवकुळे यांच्या नेतृत्वाखाली आज शिवसैनिकांनी महावितरणच्या मध्य विभाग कार्यालयावर धडक दिली. "घरमालकांना किंवा अपार्टमेंटमधील रहिवाशांना कोणतीही पूर्वकल्पना न देता, थेट घरात आणि झोपडपट्टी परिसरात घुसून दडपशाहीने हे स्मार्ट मीटर बसवले जात आहेत," असा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला. या स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांच्या वीज बिलांमध्ये मोठी तफावत येत असून सर्वसामान्यांची आर्थिक लूट होत असल्याचा संताप शिवसैनिकांनी व्यक्त केला.

"मीटर बसवणाऱ्या ठेकेदाराचा कंत्राट त्वरित रद्द करा आणि सक्ती थांबवण्याचा अधिकृत आदेश काढा," अशी मागणी करत, मागणी मान्य न झाल्यास तीव्र जिल्हाव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

स्मार्ट मीटरच्या या वाढत्या विरोधानंतर आता महावितरण कोल्हापूरकरांची ही सक्ती थांबवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विराज पाटील, सुनील मोदी, विजय देवणे, राजू यादव यांच्यासह महिला आघाडीच्या प्रतिज्ञा उत्तुरे, दीपा शिंदे आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.