शिवराज्याभिषेक दिनी पार्टी परवानगीवर पवार गटाच्या नेत्यांनी उत्पादन शुल्क सचिवांना विचारला जाब
पुणे (प्रतिनिधी) : पुण्यातील तुळापूर येथील रेव्ह पार्टी प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी काल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सचिवांची भेट घेतली. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनी, छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतीस्थळ असलेल्या तुळापूरात पार्टीची परवानगी दिलीच कशी ? असा जाब विचारला. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावरून सविस्तर माहिती दिली आहे.

खडसे म्हणाल्या की, रेव्ह पार्टीला राज्य उत्पादन शुल्क विभागानेच परवानगी दिली होती. हा किती करंटेपणा आहे? छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्याचे रक्षण करत ज्या तुळापुरात आपला देह ठेवला, त्यांची पवित्र स्मृती तिथे आहे. अशा पवित्र ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभाग मद्य आणि अंमली पदार्थांच्या पार्टीची परवानगी देतेच कसं ? कहर म्हणजे ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन असतो, आनंदाचा सोहळा असतो त्याच दिवशी ही मद्य आणि अंमली पदार्थांच्या पार्टीची परवानगी देण्यात आली आहे असे सांगत असतानाच हे शासन छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने हिंदुत्वाचा टेंभा मिरवत असते मग आता तुमचं हिंदुत्व कुठे गेले? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने सर्व शिव-शंभू प्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. शिवराज्याभिषेक दिनी पवित्र अशा तुळापूरात या पार्टीची परवानगी देणारा दीडशहाणा कोण? याची चौकशी विभागाने करावी व त्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सरचिटणीस रोहित पवार, पक्षाचे मुंबई युवक अध्यक्ष अमोल मातेले आणि अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.




