पेपरफुटी थांबवा, पक्षफोडी नव्हे; टीईटी घोटाळ्यावर आदित्य ठाकरेंचा सरकारवर निशाणा
मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटी प्रकरणावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करत त्यांनी वारंवार घडणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

आदित्य ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “NEET चा पेपर फुटला, गेल्या काही वर्षांत MPSC च्या परीक्षा वारंवार वादात अडकल्या आणि आता TET पेपरफुटीचा प्रकार समोर आला आहे. भाजपने संविधान बदलण्यासाठी पक्ष फोडण्यापेक्षा या पेपरफुटी रोखण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे होते. देशातील तरुणांचे भविष्य धोक्यात आले आहे,” असा आरोप त्यांनी केला.ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांपासून अशा घटनांची पुनरावृत्ती होत असून राज्याची प्रतिमा मलिन होत आहे. “तरुणांनी फक्त आंदोलन करायची वेळ आली आहे का? त्यांच्या स्वप्नांचे काय?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, रविवारी (28 जून) होणारी TET परीक्षा पेपरफुटीच्या संशयावरून पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने अधिकृत निवेदन जारी करत ही परीक्षा स्थगित केल्याचे जाहीर केले.मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी येथे पोलिसांनी केलेल्या कारवाईत काही संशयितांकडे प्रश्नपत्रिकेशी संबंधित प्रश्न आढळून आले. त्यानंतर पडताळणीमध्ये काही प्रश्न जुळल्याचे स्पष्ट झाले आणि या प्रकरणी भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे की, परीक्षा पारदर्शक पद्धतीने व्हावी आणि संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षेची नवीन तारीख लवकरच अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली जाणार आहे.परीक्षा आदल्या दिवशी स्थगित झाल्याने राज्यभरातील विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. वारंवार घडणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांवरून विरोधकांनी सरकारवर पुन्हा एकदा तीव्र टीका केली आहे.




