सांगलीत क्रिकेटच्या मैदानात रोहित पाटलांची दणादण फटकेबाजी; विश्वजीत कदमांचा मिश्किल सल्ला
सांगली (प्रतिनिधी) : सांगलीत सेलिब्रिटी क्रिकेट लीग स्पर्धेचा शेवटचा दिवस चांगलाच रंगला. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार, खासदारांचा संघ विरुद्ध सिनेकलाकार संघ यांच्यात जोरदार सामना पाहायला मिळाला. यामध्ये खासदार विशाल पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार विश्वजीत कदम, राहुल आवाडे, सुहास बाबर, रोहित पाटील आणि सत्यजित देशमुख सहभागी झाले होते. तर सेलिब्रिटी संघाकडून प्रवीण तरडे, सिद्धार्थ जाधव, गौरव मोरे, हार्दिक जोशी यांच्यासह अनेक कलाकार मैदानात उतरले.

सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमदार रोहित पाटील आणि उद्योजक संजय घोडावत मैदानात उतरले. सुरुवातीला रोहित पाटील यांना फलंदाजी करताना अडचण येत होती. यावेळी आमदार विश्वजीत कदम यांनी मिश्किलपणे, "रोहित, आता षटकार मारा, तुम्हाला चांगली बायको मिळेल," अशी टिप्पणी केली.विश्वजीत कदमांचा हा सल्ला रोहित पाटील यांनी अक्षरशः मनावर घेतला आणि त्यानंतर सलग चार षटकार ठोकत मैदान दणाणून सोडलं. रोहित पाटलांच्या या फटकेबाजीने प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला.
यानंतर खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे, विशाल पाटील आणि विश्वजीत कदम यांनीही जोरदार फटकेबाजी केली. दुसरीकडे सिद्धार्थ जाधव आणि प्रवीण तरडे यांनीही चांगली फलंदाजी केली. मात्र विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील, धैर्यशील माने आणि राहुल आवाडे यांच्या गोलंदाजीसमोर सेलिब्रिटी संघाची चांगलीच दमछाक झाली.अटीतटीच्या या सामन्यात अखेर लोकप्रतिनिधींच्या संघाने विजय मिळवला. विजयानंतर आमदार-खासदारांनी डीजेच्या तालावर जोरदार जल्लोष केला.
दरम्यान, सांगलीत झालेल्या विश्वजीत मराठी सेलिब्रिटी क्रिकेट लीगमध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांसोबत लावणी कलाकार गौतमी पाटील आणि तिची प्रतिस्पर्धी हिंदवी पाटील यांनीही सहभाग घेतला होता.सेलिब्रिटींच्या पहिल्याच सामन्यात हर्षल जोशी यांच्या संघाकडून गौतमी पाटील फलंदाजीसाठी मैदानात उतरली. मात्र पहिल्याच चेंडूवर गौरव मोरे यांच्या टीममधील गोलंदाजाने गौतमीला झेलबाद केलं.
गौतमी पाटील पहिल्याच चेंडूवर बाद होताच प्रेक्षकांनी जोरदार घोषणाबाजी केली. मात्र हा सामना असल्याने पुन्हा संधी देता येणार नसल्याचं सांगितल्यानंतर गौतमी पाटील मैदानाबाहेर गेली.यावेळी गौतमी पाटीलने मिश्किलपणे, "मी लावणी आणि डान्स चांगला करू शकते, मात्र क्रिकेट चांगलं खेळू शकत नाही," असं म्हटलं.




