साकीनाक्याचा महाराजा ठरणार मुंबईतील सर्वात महागडा गणपती? मूर्तीची किंमत तब्बल 16 लाख
मुंबई (प्रतिनिधी) : अवघ्या महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या गणरायाच्या आगमनाचा दिवस आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. येत्या 14 सप्टेंबरला गणेश चतुर्थीच्या दिवशी लाडका बाप्पा घरोघरी आणि सार्वजनिक गणपती मंडळांच्या मंडपात विराजमान होणार आहे. मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव हा कायमच अनेकांच्या चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय राहिला आहे. मुंबईतील उंच गणेशमूर्ती पाहण्यासाठी राज्यभरातून भाविक येतात.

यंदाही मुंबईतील मानाच्या गणेश मंडळांसह अनेक सार्वजनिक गणपती मंडळांचे बाप्पा भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत. गेल्या काही वर्षांपासून 'साकीनाक्याचा महाराजा' या नावाची मुंबईतील गणेश मंडळांमध्ये चांगलीच चर्चा होत आहे. यंदाही 'साकीनाक्याचा महाराजा' मोठ्या प्रमाणावर चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता आहे. कारण 'साकीनाक्याचा महाराजा'ची मूर्ती मुंबईतील सर्वात उंच आणि महागडी गणेशमूर्ती ठरण्याची शक्यता आहे.
प्रसिद्ध मूर्तीकार कृणाल पाटील यांच्या कारखान्यात 'साकीनाक्याचा महाराजा'ची मूर्ती तयार करण्यात आली आहे. के.पी. आर्टसमधील मूर्तीकार नीरज मोरे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, यंदा 'साकीनाक्याचा महाराजा'ची गणपतीची मूर्ती सर्वात महाग ठरणार आहे. ही मूर्ती तयार करण्यासाठी तब्बल 16 लाख रुपये खर्च आला आहे.आमच्या कारखान्यात पाच, सात आणि आठ लाख रुपयांच्या अनेक गणेशमूर्ती आहेत. अगदी घरगुती गणपतीची मूर्तीही पाच लाख रुपयांना आहे. मात्र, 'साकीनाक्याचा महाराजा' ही आमच्याकडील सर्वात महागडी गणेशमूर्ती आहे. या मूर्तीची उंची तब्बल 45 ते 48 फूट इतकी आहे.
मुंबईत गणपतीच्या मूर्तीसाठी 40 फूटांची मर्यादा आहे. त्यामुळे 'साकीनाक्याचा महाराजा'च्या मूर्तीचा वरचा आणि मागचा भाग फोल्डिंग करून वेगळा करता येईल, अशा पद्धतीने मूर्ती तयार करण्यात आली आहे. त्यामुळे ही मूर्ती मेट्रोच्या ब्रिजखालूनही नेता येईल, अशी माहिती मूर्तीकार नीरज मोरे यांनी पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत सांगितली.गणेशोत्सवाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लालबाग-परळमध्ये आज गणेशोत्सवाचा आगमन सोहळा पार पडणार आहे. 'परळचा महाराजा', 'परळचा राजा' आणि 'चिंचपोकळीचा चिंतामणी' या तीन मोठ्या गणेश मंडळांचा आगमन सोहळा होणार आहे.
'चिंचपोकळीच्या चिंतामणी'चा आगमन सोहळा दुपारी 12 वाजता सुरू होऊन रात्री दहा वाजेपर्यंत जल्लोष पाहायला मिळणार आहे. प्रसिद्ध EDM म्युझिक मेकर न्यूक्लीया आज चिंचपोकळीच्या आगमन सोहळ्यात ट्रान्स म्युझिकच्या माध्यमातून तरुणाईचे लक्ष वेधणार आहे. या आगमन सोहळ्यासाठी तरुणाई, विशेषतः GEN-Z सकाळपासूनच गर्दी करू लागली आहे. तर या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी मुंबई पोलिसांकडूनही विशेष नियोजन करण्यात आले आहे.




