सुनील तटकरे दुतोंडी? आधी नकार नंतर होकार विलीनीकरणाबद्दलच्या वेगवेगळ्या भूमिका
मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एका विशेष कार्यक्रमात अनेक मुद्द्यांवरती भाष्य केलं. यावेळी सुनील तटकरे यांनी काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश, अजित पवारांसोबतची मैत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेससमोरील आव्हान यांच्यावर विविध मुद्यांवर भाष्य केलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासंदर्भातील माहिती होतं, माझा त्याला विरोध नव्हता असं सुनील तटकरे म्हणाले. मात्र, आधी माध्यामांसमोर बोलताना सुनील तटकरेंनी याबाबतच्या गोष्टी नाकारल्या होत्या, त्यामुळे आता चर्चांना उधाण आलं आहे.

सुनील तटकरेंच्या या दोन्ही भुमिकेवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते विकास लवांडे यांनी त्यांच्यावरती हल्लाबोल केला आहे. विकास लवांडे यांनी सुनील तटकरेंची विलीनीकरणाच्या चर्चा नाकारल्याचा आणि त्याची माहिती असल्याचा व्हिडीओ शेअर करत तटकरेंवर टीका केली आहे. विकास लवांडे यांनी दोन्ही व्हिडीओ शेअर करत म्हटलंय की, "या दुतोंडीपणाला काय म्हणावे ? 16 फेब्रुवारी आणि 31 मार्च 2026 दोन्ही वेगवेगळ्या मुलाखतीत वेगवेगळ्या स्टोऱ्या का तयार केल्या ? @SunilTatkareसाहेब तुम्हीच सांगा याला काय म्हणतात ? म्हणजे तुम्ही खोटं किंवा सोईचे बोलता हे सिद्ध झाले आहे. तुम्ही अजितदादांना त्यांच्या निधनानंतर सुद्धा अविश्वास दाखवत खोटं ठरवले याचे वाईट वाटले आणि चीड येते. वर स्वतःला दादांचे मित्र म्हणवता ? कपटी मित्रा पेक्षा दिलदार शत्रू बरा!".
तर विकास लवांडे यांनी बोलताना म्हटलं की, "विलीनीकरण विषय सर्वांना माहिती होता. त्यांच्या आणि आमच्या पक्षातील नेत्यांना माहिती होतं. जे सतत अजित पवार यांचे ३५ वर्ष आपण कसे मित्र होतो हे सांगणारे तटकरे किती खोटं बोलतात हे आता स्पष्ट झालं आहे. १६ मार्चला ते म्हणाले मला विलीनीकरण माहिती नाही आणि काल म्हणाले मला माहिती होतं. मराठी मधे म्हण आहे अडचणीत आणणाऱ्या मित्रा पेक्षा दिलदार शत्रू बरा.आता विलीनीकरण विषय आमच्याकडून संपला आहे, असंही पुढे लवांडे यांनी म्हटलं आहे.




