विश्वविजेत्या टीम इंडियासाठी BCCI ने उघडला पेटारा, किती कोटी मिळाले?

विश्वविजेत्या टीम इंडियासाठी BCCI ने उघडला पेटारा, किती कोटी मिळाले?

मुंबई (प्रतिनिधी) :आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 च्या अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने तब्बल 96 धावांनी विजय मिळवला. भारताने सलग दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. टीम इंडियाच्या या विजयानंतर आता बीसीसीआयकडून मोठं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे.

विश्वविजेत्या टीम इंडियाला आयसीसीकडून 27.48 कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले गेले. आता बीसीसीआयने देखील टीम इंडियातील खेळाडूंसाठी पेटाला उघडला आहे. आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 चे जेतेपद पटकावणाऱ्या टीम इंडियाला 131 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. भारतीय संघाने 2024 मध्ये जेव्हा रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टी-20 विश्वचषक जिंकला होता. त्यावेळी बीसीसीआयने 125 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. म्हणजे 2024 पेक्षाही 6 कोटी रुपये जास्त यंदा बीसीसीआयने टीम इंडियाला दिले.

टीम इंडियाला ट्रॉफीबरोबरच मोठी रक्कमही मिळाली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने या स्पर्धेसाठी एकूण 13.5 मिलियन डॉलर्स (सुमारे 120 कोटी रुपये) इतकी प्राईज जाहीर केली.  टी-20 विश्वचषक 2026 जिंकल्यानंतर भारतीय संघाला 3 मिलियन डॉलर्स (सुमारे 27.5 कोटी रुपये) इतकी इनामी रक्कम मिळाली. ही रक्कम प्रथम भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (BCCI) दिली जाते आणि त्यानंतर खेळाडूंमध्ये बोनस, मॅच फी आणि इतर बक्षिसांच्या स्वरूपात वाटली जाते.

न्यूझीलंडला पराभूत करुन पुन्हा टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय खेळाडूंनी जोरदार सेलिब्रेशन केले. भारतीय संघातील खेळाडूंचे कुटुंबीय देखील या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताच्या संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि इशान किशन  या तीन फलंदाजांनी न्यूझीलंडच्या आक्रमणाच्या अक्षरश: चिंधड्या उडवल्या. भारताने सलामीच्या फलंदाजांच्या धडाकेबाज अर्धशतकांच्या जोरावर भारतानं 20 षटकांत पाच बाद 255 धावांची मजल मारली होती.भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा अख्खा डाव 159 धावांत कोलमडला. भारताकडून जसप्रीत बुमरानं चार, तर अक्षर पटेलनं तीन विकेट्स काढून न्यूझीलंडला रोखण्यात मोलाची भूमिका बजावली.