मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग समितीच्या निवडणुकीत शिवसेनेचा पराभव

मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग समितीच्या निवडणुकीत शिवसेनेचा पराभव

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या कारभारात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सोमवारी एका ट्विस्टमुळे मोठी रंगत आली. मुंबई महानगरपालिकेच्या पाच प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदाची निवडणूक सोमवारी पार पडली. काल झालेल्या प्रभाग समितीच्या निवडणुकीत  बिनविरोध अध्यक्ष निवडले गेले, तर एका ठिकाणी निवडणूक झाली. मात्र, भाजपच्या तोडीस तोड नगरसेवकांचे संख्याबळ असूनही एस आणि टी प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत  ठाकरे सेनेला पराभवाचा धक्का बसला. 10 - 10 सदस्य संख्या असल्याने या प्रभागात निवडणूक झाली होती. मात्र, ठाकरे सेनेचे  दोन मतं बाद ठरल्याने अखेर भाजप उमेदवाराचा विजय झाला. त्यामुळे भाजपच्या साक्षी दळवी प्रभाग समिती अध्यक्षपदी विराजमान झाल्या. 17  प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदांसाठी 5, 6 आणि 9 मार्च रोजी निवडणुका पार पडल्या. एकूण 17 पैकी 11 प्रभाग समित्यांवर भाजप आणि शिवसेनेचे वर्चस्व राहिले. उर्वरित सहा समित्यांच्या अध्यक्षांमध्ये ‘उबाठा’चे दोन, काँग्रेसचे दोन, मनसेचे एक आणि एमआयएमचे एक उमेदवार निवडून आले आहेत.

एस आणि टी प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी भाजपच्या साक्षी दळवी 10 मते मिळवून विजयी झाल्या. त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेना (उबाठा) पक्षाचे सुरेश शिंदे यांना आठ मते मिळाली. ठाकरे गटाची दोन मते ऐनवेळी एका चुकीमुळे अवैध ठरली.

या समितीमध्ये महायुतीचे १० आणि 'उबाठा' सह मित्रपक्षांचे १० असे एकूण २० सदस्य आहेत. 'उबाठा'चे सुरेश शिंदे व 'उबाठा'च्या नगरसेविका दीपमाला बढे यांनी भाजपच्या उमेदवार साक्षी दळवी यांच्या बाजूने असलेल्या कॉलममध्ये सह्या केल्या. त्यामुळे ही दोन मते अवैध ठरली. दोन्ही अनुभवी नगरसेवकांनी या चुका केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर एम पूर्व प्रभाग समिती अध्यक्षपदी एमआयएमच्या खैरनुसा हुसेन यांना आठ मते मिळाली, तर शिवसेनेच्या प्रज्ञा सदाफुले यांना पाच मते मिळाली. तर, एक मत अवैध ठरले. त्यामुळे एमआयएमच्या हुसेन निवडून आल्या. एम पश्चिम, एल आणि एन या प्रभागांच्या अध्यक्षपदी अनुक्रमे भाजपच्या आशा मराठे, शिवसेनेचे विजयेंद्र शिंदे आणि भाजपच्या अश्विनी मते यांची बिनविरोध निवड झाली. 

मुंबई महापालिकेच्या प्रभाग समितीच्या उरलेल्या 5 प्रभागांसाठी सोमवारी तिसऱ्या टप्प्यात निवडणूक पार पडली. गेल्या दोन्ही झालेल्या निवडणुकीत एक ठिकाणी ठाकरे सेनेचा अनपेक्षित झालेला पराभव तर दुसरीकडे ठाकरे बंधूंचे समोरासमोर आलेले शिलेदार, यामुळे निवडणुकीत रंगत आली होती. त्यामुळे कालच्या पाच प्रभाग समितींच्या अध्यक्षपदाची निवडणूकही चर्चेचा विषय ठरली. काल १) एल, २) एन, ३) एम पश्चिम, ४) एम पूर्व आणि ५) एस आणि टी या पाच प्रभागांमध्ये अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. नगरसेवकांच्या संख्याबळानुसार 5 पैकी 4 प्रभाग समित्यांचे अध्यक्ष बिनविरोध निवडून येतील, असे चित्र होते. फक्त मुलुंडमधील एस आणि टी प्रभागात भाजप आणि ठाकरे गटाकडे 10- 10 नगरसेवक आहेत . त्यामुळे निवडणुकीत समसमान मतं मिळाल्यास ईश्वरचिठ्ठीने अध्यक्ष निवडला जाईल, असा अंदाज होता.