भेसळखोरांमागोमाग आता चायनीज स्टॉलवर FDA ची नजर; तुकाराम मुंढांच्या इशाऱ्याने व्यावसायिकांचे धाबे दणाणले
मुंबई : राज्यात भेसळयुक्त अन्नपदार्थ, दूध, पनीर, मिठाई आणि निकृष्ट मालाविराधात धडक कारवायांचा धडाका सुरू असतानाच, अन्न व औषध प्रशासनाने (FDA) आता आपला मोर्चा आणखी एका लोकप्रिय क्षेत्राकडे वळवला आहे. रस्त्यावरील चायनीज फूड स्टॉल आणि हातगाड्यांवरील खाद्यपदार्थांचीही लवकरच कसून तपासणी होण्याची दाट शक्यता असून, FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी याबाबत अत्यंत सूचक वक्तव्य केले आहे. त्यांच्या या इशाऱ्यामुळे राज्यातील चायनीज फूड विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

पुण्यातील मुलाखतीत दिले मोठे संकेत
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्तपद स्वीकारल्यापासून तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात भेसळखोरांविरोधात मोठी मोहीम राबवली जात आहे. दूध, मिठाईपासून ते हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि गुटखा विक्रीपर्यंत अनेक ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या आहेत. दरम्यान, पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे झालेल्या एका मुलाखतीदरम्यान बोलताना त्यांनी चायनीज फूडबाबत महत्त्वाचे भाष्य केले. गेल्या दोन महिन्यांत FDA कडून मोठ्या प्रमाणावर कारवाया झाल्यानंतर, नागरिकांकडून चायनीज फूडच्या गुणवत्तेवरही लक्ष देण्याची मागणी होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
पुण्याच्या जुन्या आठवणी आणि स्वच्छतेचा मुद्दा
चायनीज फूडचा विषय निघाल्यावर मुंढेंनी आपल्या पुण्यातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. पुण्यातील बापट रोड आणि पाषाण रोड परिसरातील चायनीजच्या गाड्यांचा संदर्भ देत त्यांनी आपण तिथे पहिल्यांदा चायनीज फूड खाल्ल्याचे सांगितले. आजच्या काळात चायनीज पदार्थांची मागणी अफाट वाढली आहे. मात्र, अशा स्टॉल्सवर खाद्यपदार्थ तयार करताना आवश्यक स्वच्छता राखली जाते का, वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाची गुणवत्ता कशी आहे आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे तंतोतंत पालन होते का, या सर्व गोष्टींवर आता FDA ची करडी नजर असणार आहे, असे त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले आहे.
चायनीज स्टॉलवर नेमकी कशाची तपासणी होणार?
खाद्यपदार्थ तयार करण्याची पद्धत, वापरले जाणारे सॉस व इतर साहित्य, आरोग्याला घातक ठरणारे रंग, स्टॉल परिसरातील स्वच्छता आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन होते किंवा नाही, या मुद्द्यांवर प्रशासनाकडून विशेष तपासणी केली जाण्याची शक्यता आहे. विशेषतः रस्त्याच्या कडेला किंवा हातगाड्यांवर उघड्यावर पदार्थ विकणाऱ्या विक्रेत्यांवर प्रशासनाचा बडगा उगारला जाऊ शकतो.
सॉफ्ट आणि अल्कोहोलिक ड्रिंक्सही रडारवर
केवळ खाद्यपदार्थच नव्हे, तर पेयांच्या बाबतीतही तुकाराम मुंढे यांनी अत्यंत महत्त्वाचे संकेत दिले आहेत. अल्कोहोलिक ड्रिंक्स आणि सॉफ्ट ड्रिंक्स या दोन्ही प्रकारच्या पेयांची गुणवत्ता, त्यांची उत्पादन प्रक्रिया आणि पॅकिंगवरील लेबलिंग या सर्व बाबी FDA च्या अधिकारक्षेत्रात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या क्षेत्रासाठीही प्रशासनाकडून विशेष नियोजन करण्यात आले असून, सध्या इतर कामांचा व्याप जास्त असला तरी आगामी काळात पेयांच्या गुणवत्तेवरही प्रशासनाकडून मोठी कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तुकाराम मुंढे यांच्या या धडक भूमिकेमुळे राज्यातील अन्न आणि पेय उद्योगातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले असून, आगामी काळात FDA च्या कारवायांचा वेग आणखी वाढणार हे निश्चित मानले जात आहे.




