हिंदी रिक्षाचालकांना मराठी परीक्षेत नेमके कोणते प्रश्न विचारले? व्हायरल व्हिडीओमध्ये तोडक्यामोडक्या मराठीत मजेशीर उत्तरं

हिंदी रिक्षाचालकांना मराठी परीक्षेत नेमके कोणते प्रश्न विचारले? व्हायरल व्हिडीओमध्ये तोडक्यामोडक्या मराठीत मजेशीर उत्तरं

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईसह महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकणे अनिवार्य असेल, असा आदेश काही दिवसांपूर्वी परिवहन विभागाने काढला होता. यासाठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना कामचलाऊ मराठी भाषा शिकण्यासाठी तीन महिन्यांची मुदतही देण्यात आली होती.या रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी विविध ठिकाणी मराठी भाषेचे प्रशिक्षण वर्गही सुरू करण्यात आले होते. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आता या चालकांची मराठी भाषेची परीक्षा घेतली जात आहे. अशाच एका परीक्षेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये ‘शर्मा’, ‘वर्मा’ अशी हिंदी आडनावे असलेले रिक्षाचालक एखाद्या शाळेतील विद्यार्थ्याप्रमाणे मराठी भाषेची परीक्षा देताना दिसत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर परीक्षेचा तणावही स्पष्टपणे जाणवत आहे.भांबावलेले आणि काहीसे गांगरलेले हे रिक्षाचालक मराठीत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं त्यांना जमेल तशा जुजबी आणि तोडक्यामोडक्या मराठीत देताना दिसत आहेत.

“तुमचं पूर्ण नाव सांगा?”, “तुम्ही कुठून आलात?”, “तुम्ही माझ्या रिक्षात बसा, हे समोरच्याला कसं सांगाल?” असे काही प्रश्न या परीक्षेत विचारले जात असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.यातील दोन-तीन प्रश्नांची उत्तरं बहुतांश हिंदीभाषिक रिक्षाचालक सहजपणे देताना दिसत आहेत. मात्र, मराठीतील काही शब्दांबाबत अजूनही या रिक्षाचालकांचा गोंधळ उडताना दिसतो.

तरीही एकूणच या रिक्षाचालकांना मराठी भाषेचं जुजबी ज्ञान झाल्याचं या व्हिडीओमधून दिसून येत आहे. या परीक्षेचा हा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.दरम्यान, महाराष्ट्रात प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या व्यावसायिक प्रवासी वाहनांच्या चालकांना प्रवाशांशी प्रभावीपणे संवाद साधता यावा, यासाठी व्यवहारिक मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात आले आहे.

महाराष्ट्र मोटार वाहन नियम, 1989 मध्ये करण्यात आलेल्या सुधारणांद्वारे ही अट अधिक स्पष्ट करण्यात आली आहे. मराठीचे आवश्यक ज्ञान नसलेल्या चालकाच्या वाहन चालविण्याच्या परवान्यावरील संबंधित अधिकृतता निलंबित किंवा रद्द करण्याची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.शासनाच्या अधिसूचनेनुसार Maharashtra Motor Vehicles (Amendment) Rules, 2026 अंतर्गत महाराष्ट्र मोटार वाहन नियम, 1989 मध्ये विविध महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत.

या सुधारणांमध्ये रिक्षा, टॅक्सी तसेच इलेक्ट्रॉनिक मीटर बसविलेल्या ॲप-आधारित मोटार कॅब आणि त्यांच्या परवाना व अधिकृततेशी संबंधित चालक तसेच परमिटधारकांसाठी व्यवहारिक मराठी भाषेच्या ज्ञानाची अट स्पष्ट करण्यात आली आहे.