अभिजीत दिपके हळूहळू परिपक्व होतील, संघर्षात हे सहन करावंच लागतं; संजय राऊतांचा ‘प्रेमाचा सल्ला’

अभिजीत दिपके हळूहळू परिपक्व होतील, संघर्षात हे सहन करावंच लागतं; संजय राऊतांचा ‘प्रेमाचा सल्ला’

मुंबई (प्रतिनिधी) : ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दिपके आणि पोलीस अधिकारी यांच्यात छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या शाब्दिक वादानंतर तसेच त्यांच्यावर ठेवण्यात येणाऱ्या पाळतीवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अभिजीत दिपके हळूहळू परिपक्व होतील, संघर्षामध्ये या गोष्टी सहन कराव्याच लागतात, असं म्हणत संजय राऊत यांनी अभिजीत दिपके यांना प्रेमाचा सल्ला दिला आहे.

अभिजीत दिपके यांच्यावर ठेवण्यात येणाऱ्या पाळतीबाबत आणि पोलिसांसोबत झालेल्या वादावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, “अभिजीत दिपके हे आता ज्या आंदोलनातून पुढे आले आहेत, या देशातली एक सिस्टीम अशा प्रकारची पाळत सगळ्या पक्षांवर ठेवते. राजकारणात हे सगळं सहन करायचं असतं. आमच्यावर कोणी पाळत ठेवली म्हणून आमचं काम थांबलं का? अभिजीत दिपके हळूहळू परिपक्व होतील.”

पुढे बोलताना राऊत म्हणाले, “सरकार पावलोपावली विरोध करेल, अडथळे निर्माण करेल. सरकार आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करेल. आमच्यावरही असे गुन्हे दाखल झाले, आम्ही तुरुंगात गेलो. या गोष्टी लढताना आणि संघर्ष करताना सहन कराव्या लागतात. तरच आपण जमिनीवर टिकून राहू शकतो. हा माझा त्यांना प्रेमाचा सल्ला आहे. तो मुलगा लहान आहे,” असं त्यांनी म्हटलं.

संजय राऊत पुढे म्हणाले की, “झारखंडमध्ये नेहा बोरावर शाई फेकली. तिचं करिअर बघा, त्यांचा चेहरा बघा. देशाचं नेतृत्व ही मुलं या वयात करत आहेत. झारखंडमध्ये तिच्या अंगावर आणि चेहऱ्यावर एका RSS आणि भाजपच्या गुंडाने शाई फेकली. ती एवढंच म्हणाली की, शाई ही तोंडावर फेकण्यासाठी नसते, तर लिहिण्यासाठी असते. या शाईतून क्रांतीची गीते लिहिली जातात,” असंही त्यांनी म्हटलं.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथील अभिजीत दिपके यांच्या निवासस्थानी त्यांना भेटण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेसाठी आणि देखरेखीसाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मात्र, भेटण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना पोलीस प्रशासनाकडून उद्धट वागणूक दिली जात असल्याचा आरोप करत दिपके पोलीस अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले. दिपके यांनी आक्रमक पवित्रा घेत अधिकाऱ्याला सुनावलं, “पोलिसांनी मला सांगायचं नाही की मी कोणाला भेटायचं? मी कोणाला भेटायचं आणि कोणाला नाही, हे मी ठरवणार. तुम्ही कोणत्या विभागाचे आहात? कोणत्या पोलीस ठाण्याचे आहात? तुमचं पद काय आहे?” असा सवाल करत त्यांनी पोलिसांना आपल्या घराच्या परिसरातून थेट बाहेर जाण्यास सांगितलं.

याशिवाय दिल्लीतील भारत मंडपममधील कार्यक्रमात एआय टूलच्या सादरीकरणासाठी स्वतःची वैयक्तिक माहिती उघड केल्याचा गंभीर आरोपही अभिजीत दिपके यांनी केला आहे. सरकारी अधिकाऱ्यांसमोर माझी वैयक्तिक माहिती उघड करण्याची परवानगी कशी देण्यात आली? सरकार अमेरिकन कंपन्यांच्या माध्यमातून आपल्यावर पाळत ठेवण्याचा प्रयत्न करत आहे का? असा थेट सवाल त्यांनी ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.