कारमधील अपघातात तीन मित्रांचा मृत्यू, मोबाइलमधील इमर्जन्सी अलर्टमुळे समजली दुर्घटना

कारमधील अपघातात  तीन मित्रांचा मृत्यू, मोबाइलमधील इमर्जन्सी अलर्टमुळे समजली दुर्घटना

पुणे (प्रतिनिधी) : "अपघात झाल्याचा मेसेज मोबाइलवर आला आणि काळजाचा ठोका चुकला. मनात पाल चुकचुकली की काहीतरी अघटित घडलंय. मी तातडीने दुसऱ्या कारमधील मित्रांना फोन केला आणि अवघ्या १५ मिनिटांत त्यांनी तिघांच्या मृत्यूची बातमी दिली. त्या क्षणी मी पुरता हादरून गेलो," अशा शब्दांत रावेत येथील सार्थक तुपे याने आपल्या भावना व्यक्त केल्या.पिंपरी-चिंचवडमधील काही तरुण तीन कारमधून लेह-लडाखला फिरायला गेले होते. मात्र, बुधवारी राजस्थानमध्ये त्यांच्या एका कारला भीषण अपघात झाला. या अपघातात कुणाल चोरडिया, मयुरेश पाडाळे आणि सिद्धांत आल्हाट या तिघांचा जागीच मृत्यू झाला.

मृत सिद्धांत आल्हाट याच्या मोबाइलमध्ये आपत्कालीन संपर्कासाठी सार्थक तुपे याचा क्रमांक सेव्ह होता. कारचा भीषण अपघात होताच, मोबाइलमधील सेन्सरमुळे बुधवारी सकाळी १०:०५ वाजता सार्थकच्या फोनवर 'कार क्रॅश' झाल्याचा ऑटोमॅटिक एसएमएस आला. या तंत्रज्ञानामुळेच या भीषण दुर्घटनेची माहिती तातडीने मित्र आणि नातेवाईकांपर्यंत पोहोचली.

सार्थक तुपे याने सांगितले की, "या सहलीसाठी मित्रांनी मलाही खूप आग्रह केला होता. पण काही वैयक्तिक कारणांमुळे मी जाऊ शकलो नाही. तरीही मी त्यांच्या सतत संपर्कात होतो. तिन्ही कार एकमेकांच्या सोबतीनेच चालल्या होत्या, मात्र महामार्गावर एका ठिकाणी दोन कार थांबल्या असताना पुढच्या कारला हा भीषण अपघात झाला."

सार्थकने मेसेज मिळताच दुसऱ्या कारमधील आयुष बारणे याला फोन करून घटनेची कल्पना दिली. दोन्ही कार तातडीने घटनास्थळी पोहोचल्या, तेव्हा सिद्धांतची कार पूर्णपणे चक्काचूर झाली होती. स्थानिक लोक तिघांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. सार्थकनेच सिद्धांतचा मोठा भाऊ रोहन आल्हाट तसेच कुणाल आणि मयुरेशच्या नातेवाईकांना या घटनेची माहिती दिली.या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड परिसरात आणि मृत तरुणांच्या मित्रपरिवारात मोठी शोककळा पसरली आहे. एका आनंदाच्या सहलीचा शेवट असा भीषण होईल, अशी कल्पनाही कोणी केली नव्हती.

कारगिल येथे हे तरुण आठ दिवसांपूर्वी पाच दिवस अडकले होते. बर्फवृष्टी झाल्याने सर्व रस्ते बंद होते. त्यावेळीही त्यांचा फोन आला होता. 'बीएसएफ'च्या कमांडरशी संवाद साधून या तरुणांना तेथून सोडले होते, असेही खासदार बारणे यांनी सांगितले. आमदार शंकर जगताप म्हणाले, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना मी घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी मदत करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. मृतदेह विमानाने पिंपरी चिंचवडमध्ये आणण्यासाठी आवश्यक ती मदत करणार आहेत.

पर्यटनस्थळी फिरत असलेल्या तरुणांपैकी एकाला मंगळवारी (दि. १७) अस्वस्थ वाटू लागल्यामुळे तो तातडीने विमानाने घरी निघून आला होता. तो ज्या कारमधून पर्यटनस्थळी प्रवास करत होता त्याच कारच्या अपघाताची माहिती समजली आणि संबंधित तरुणाला धक्का बसला.