टीईटी उत्तीर्ण शिक्षकांची पदोन्नती सेवाजेष्ठतेने व्हावी- शिक्षक संघटनांची मागणी
कोल्हापूर (प्रतिनिधी): जिल्हा परिषद सेवा प्रवेश नियम 1967 नुसार कोणतेही पदोन्नतीसाठी पात्र असलेल्या शिक्षकांच्या पदोन्नती या सेवाजेष्ठतेने असल्याने सर्व प्रकारच्या पदोन्नती या सेवाजेष्ठतेने होण्याचे निर्देश व्हावेत यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा सर्व शिक्षक संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला.

जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी कोल्हापूर येथे नुकत्याच झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शिक्षक संघांचे राज्य कोषाध्यक्ष संभाजी बापट होते.
यावेळी बोलताना पुरोगामी शिक्षक संघटनेचे राज्यध्यक्ष प्रसाद पाटील म्हणाले 1 सप्टेंबर 2025 रोजीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामधील कलम 216 अन्वये शिक्षकांना पदोन्नती हवी असेल तर टीईटी उत्तीर्ण होणे आवश्यक असल्याचे निर्देश दिल्याने त्याचा सन्मान ठेवत अनेक सेवाजेष्ठ शिक्षक वयाच्या 50 ते 57 व्या वर्षी टीईटी उत्तीर्ण झाले आहेत. मात्र राज्याचे शिक्षण संचालक यांचे 14 मे 2026 च्या पत्राचा आधार घेत राज्यातील पदोन्नती प्रक्रियेमध्ये 1 सप्टेंबर 2025 पूर्वी टीईटी उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांना प्राधान्य दिले जात आहे. हा टीईटी उत्तीर्ण असलेल्या सेवाजेष्ठ शिक्षकांवर अन्याय असून शासनाने पदोन्नती समिती बैठकीच्या दिनांकाची पात्रता विचारात पदोन्नती प्रक्रिया होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पुरोगामी शिक्षक संघटनेचे राज्यध्यक्ष प्रसाद पाटील यांनी केले.
या वेळी बोलताना शिक्षक समितीचे जिल्हा अध्यक्ष प्रमोद तौदकर म्हणाले एकदा सेवाकनिष्ठ शिक्षक पदोन्नत झाले तर त्या जागा लवकर रिक्त होणार नाहीत. त्यामुळे सेवाजेष्ठ शिक्षक पात्र असूनही पदोन्नतीविना सेवानिवृत्त होणार आहेत.उलट पूर्वीप्रमाणे प्रमोशन झाली तर प्रत्येकाला प्रमोशन मिळत राहील.
शिक्षक संघांचे जिल्हाध्यक्ष बबन केकरे म्हणाले वरिष्ठ पदावर पादोन्नती होताना अनुभव महत्वाचा असल्याने सेवाजेष्ठतेनेच पदोन्नती होणे आवश्यक आहे.
शिक्षक संघ थोरात गटाचे जिल्हा उपाध्यक्ष तानाजी मेढे म्हणाले शासनाने आतापर्यंत शिक्षकांना टीईटी अनिवार्य असल्याचे कळवले नव्हते. सर्वोच्च न्यायालयच्या निर्णयानंतर टीईटी उत्तीर्ण झालेल्या सेवाजेष्ठ शिक्षकांना पदोन्नती मिळणे हा त्यांचा हक्क आहे.
या बैठकीस संभाजी बापट, प्रसाद पाटील, प्रमोद तौदकर, बबन केकरे, तानाजी मेढे, प्रशांत पोतदार, बाजीराव कांबळे, श्रीकांत टिपूगडे, मनोज माळवदकर, साताप्पा चौगले, श्वेता खांडेकर, नवनाथ व्हरकट, सखाराम राजुगडे, रमेश अमानगी, जयसिंग माळवी, विनायक कोरोचीकार, रावसाहेब पाटील, मधुकर भाटले, बाळनाथ डवरी, शंकर फासके आदी उपास्थित होते.




