'कपबशी'च्या प्रमोशनदरम्यान पूजा सावंतच्या गाडीला अपघात; हायवेवर तीन वाहनांची धडक
मुंबई (प्रतिनिधी) : मराठी चित्रपटसृष्टीतील आगामी 'कपबशी' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान एक धक्कादायक घटना घडली. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पुण्याहून सांगलीकडे जात असताना 3 गाड्या एकमेकांवर आदळल्या. अपघात झालं त्यावेळी गाडीत अभिनेत्री पूजा सावंत, अभिनेता ऋषी मनोहर आणि चित्रपटाचे प्रसिद्धी प्रमुख दर्शन मुसळे होते. सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नसून सर्वजण सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सातारा जिल्ह्यातील काशीळ परिसरात हा अपघात झाला. महामार्गावर तीन वाहने एकमेकांवर आदळल्याने हा अपघात घडला. अपघातात संबंधित गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी गाडीतील प्रवाशांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. काहींना किरकोळ मुका मार लागल्याचे सांगितले जात आहे.
'कपबशी' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कलाकार आणि चित्रपटाची टीम पुण्याहून सांगलीकडे रवाना झाली होती. याच प्रवासादरम्यान हा अपघात घडला. अपघातानंतर काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, स्थानिकांच्या मदतीने आणि तातडीने करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे परिस्थिती नियंत्रणात आली. दरम्यान, पूजा सावंत, ऋषी मनोहर आणि दर्शन मुसळे हे सर्वजण सुरक्षित असल्याने चाहत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.




