शपथविधीबाबत समीर भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट; भाजपच्या विरोधाचा दावा फेटाळला

शपथविधीबाबत समीर भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट; भाजपच्या विरोधाचा दावा फेटाळला

मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसची जागा आपल्याला मिळावी आणि पुतण्या समीर भुजबळांना मंत्रि‍पदाची संधी देण्यात यावी, अशी मागणी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केली होती. मात्र, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांचा हा प्रस्ताव मान्य न केल्याने अखेर राजेंद्र जैन यांना राष्ट्रवादीने राज्यसभा खासदारकीची संदी दिली. राजेंद्र जैन यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांची बिनविरोध निवड झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र, आपल्याला संधी न मिळाल्याने छगन भुजबळांची नाराजी उघड झाली. जो न्याय इतर नेत्यांच्या मुला-बाळांना लागू तोच मलाही मिळायला हवा, असे छगन भुजबळ यांनी म्हटले होते. आता, समीर भुजबळ यांनी देखील राज्यसभा आणि मंत्रिपदासंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. 

मी नाराज नाही, मुख्यमंत्र्यांसोबत मंत्रिपदाबाबत चर्चा झाली. मात्र, मंत्रिपदाच्या शपथेसाठी वेळ अतिशय कमी होता त्यामुळे शपथविधी पार पडला नाही. भाजपकडून शब्द देण्यात आला आहे, ज्यावेळी मंत्रिमंडळ विस्तार होईल किंवा मंत्रिमंडळ फेरबदल होईल त्यावेळी मला नक्की संधी मिळेल, असे म्हणत राज्यसभा निवडणुकीच्या घडामोडीतील इनसाईड स्टोरीच समीर भुजबळ यांनी सांगितली. दरम्यान, राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने प्रफुल पटेल यांचे निकटवर्ती असलेल्या राजेंद्र जैन यांना संधी दिली असून विधानपरिषद निवडणुकीत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे यांना बिनविरोध निवडून आणले आहे. त्यामुळे, समीर भुजबळ यांच्या मंत्रिपदासाठी छगन भुजबळ आग्रही होते. मात्र, त्यांची मागणी सध्यातरी वेटींगवर असल्याचं दिसून येतं. 

मंत्री छगन भुजबळ यांची संसदेत काम करण्याची इच्छा आहे. यापूर्वी 2 ते 3 वेळा संधी देखील चालून आली होती. मात्र, काही कारणास्तव ते होऊ शकलं नाही. त्यामुळे, माझा राज्यसभेवर जाण्याच विषय नव्हता. मी लहानपणापासून राजकारणात काम करत आहे. आधी शिवसैनिक म्हणून काम केलं. साहेबांसोबत राष्ट्रवादीत आलो, त्यानंतर 1999 सालापासून राजकारणात काम करत आहे. पक्षाचा झेंडा बनवणे, चिन्ह ठरवणे, क्षण्मुखानंद आणि दादर शिवाजी पार्क मैदानातील सभांचं आयोजन करणे, राज्यात सभा नियोजन करणे अशी सगळी कामे करत आलो आहे. आज 25 वर्षापेक्षा जास्त काळ राष्ट्रवादी सोबत काम करत आहे. त्यामुळे मला संधी मिळायला काहीच अडचण नाही, अशी भूमिका समीर भुजबळ यांनी मांडली. तसेच, भविष्यात मंत्रि‍पदाचा शब्द देण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.