अजित डोवाल यांच्या गौरव सोहळ्यात सुनेत्रा पवारांकडून सरकारचं कौतुक; एकनाथ शिंदे म्हणाले, राम-लक्ष्मणाप्रमाणेच मोदी-शाहांची जोडी
मुंबई (प्रतिनिधी) : लोकमान्य टिळक यांच्या १०६व्या पुण्यतिथीनिमित्त लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे दरवर्षी दिला जाणारा प्रतिष्ठेचा 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' यंदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना प्रदान करण्यात आला. या सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होते. यावेळी बोलताना सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांनी अजित डोवाल यांच्या कार्याचा गौरव करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या नेतृत्वाचंही कौतुक केलं.

भाषणात सुनेत्रा पवार म्हणाल्या, आजचा हा सोहळा केवळ पुरस्कार वितरणाचा नाही, तर राष्ट्रभक्ती, धैर्य, दूरदृष्टी आणि कर्तव्यनिष्ठेचा गौरव करणारा ऐतिहासिक क्षण आहे. लोकमान्य टिळक यांच्या नावाचा हा सन्मान अशा व्यक्तिमत्त्वाला दिला जात आहे, ज्यांनी संपूर्ण आयुष्य राष्ट्राच्या सुरक्षेसाठी समर्पित केलं आहे.
त्या पुढे म्हणाल्या, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारताने जागतिक स्तरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे. आर्थिक विकास, पायाभूत सुविधा, संरक्षण, परराष्ट्र धोरण आणि राष्ट्रीय सुरक्षेसारख्या प्रत्येक क्षेत्रात भारत नव्या उंचीवर पोहोचत आहे. या प्रवासात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अंतर्गत सुरक्षा मजबूत करणे, दहशतवादाविरोधात कठोर कारवाई करणे आणि सीमांचे संरक्षण यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
सुनेत्रा पवार यांनी पुढे म्हटलं, लोकमान्य टिळकांनी देशाला स्वराज्याचा मंत्र दिला. आज त्या स्वराज्याच्या सुरक्षेची जबाबदारी अजित डोवाल यांच्यासारखे अधिकारी पार पाडत आहेत. त्यामुळे हा सन्मान केवळ एका व्यक्तीचा नसून संपूर्ण देशाच्या सुरक्षा व्यवस्थेचाही गौरव आहे. अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली देशाची अंतर्गत सुरक्षा अधिक बळकट झाली असून, भारताची नागरिक म्हणून मला त्याचा अभिमान वाटतो.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अजित डोवाल यांच्या कार्याचं कौतुक करत मोदी-शाह यांच्या नेतृत्वावर भाष्य केलं. ते म्हणाले, "डोवालजींना अमितभाईंच्या हस्ते हा पुरस्कार मिळणं म्हणजे 'दुग्धशर्करा योग' आहे. एकीकडे देशाच्या अंतर्गत सुरक्षेला नवी दिशा देणारे अमित शाह आणि दुसरीकडे देशाच्या सीमांचं रक्षण करणारे रणनीतीकार अजित डोवाल. हा राष्ट्रनिष्ठा आणि राष्ट्रीय सुरक्षेला सलाम करणारा क्षण आहे.
शिंदे पुढे म्हणाले, २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांनी देशात नव्या नेतृत्वाची सुरुवात केली आणि अमित शाह सुरुवातीपासून त्यांच्या सावलीसारखे सोबत उभे राहिले. जसं आपण रामाचं नाव घेताना लक्ष्मणाचंही नाव घेतो, तसंच आज देशातील अनेक नागरिक 'मोदी-शाह' अशी जोडी म्हणून त्यांचा उल्लेख करतात. ही देशासाठी अभिमानाची बाब आहे.
अजित डोवाल यांच्या कारकिर्दीचा उल्लेख करत शिंदे म्हणाले, देशाच्या गुप्तचर यंत्रणेला अधिक सक्षम बनवण्यात आणि दहशतवादाविरोधातील लढ्यात डोवाल यांचं योगदान मोठं आहे. ते सात वर्षे पाकिस्तानमध्ये अंडरकव्हर एजंट म्हणून कार्यरत होते. ऑपरेशन ब्लू स्टारपूर्वी त्यांनी महत्त्वाची माहिती मिळवून दिली. पंजाबमधील खलिस्तानवादी चळवळीविरोधातील त्यांच्या भूमिकेसाठी त्यांना 'कीर्ती चक्र' प्रदान करण्यात आलं. भारतीय सैन्याबाहेरील व्यक्ती म्हणून हा सन्मान मिळवणाऱ्यांमध्ये त्यांचं नाव विशेष ठरतं, असं सांगत त्यांनी अजित डोवाल यांचं कौतुक केलं.




