पुण्यात डीजे बंदीसाठी जनआंदोलन; बालगंधर्व चौक ते महापालिका मोर्चात विद्यानंद बापटांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध

पुण्यात डीजे बंदीसाठी जनआंदोलन; बालगंधर्व चौक ते महापालिका मोर्चात विद्यानंद बापटांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध

पुणे: कर्णाकर्कश डीजेच्या विरोधात पुण्यातून पेटलेले लोण आता संपूर्ण राज्यात पसरत असून, ध्वनीप्रदूषणाला आळा घालावा आणि राज्यात डीजेवर संपूर्ण बंदी आणावी, यासाठी पुणेकर रस्त्यावर उतरले आहेत. बालगंधर्व चौक ते पुणे महापालिका यादरम्यान भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात डीजे बंदीच्या मागणीसोबतच, डीजेविरोधात लढा देणारे कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.

पुण्यात डीजेविरोधात आवाज उठवल्यामुळे यापूर्वीही दोन मोर्चे काढून निषेध नोंदवण्यात आला असून, आजचा हा तिसरा मोर्चा होता. सुरक्षेचा उपाय म्हणून या मोर्चात विद्यानंद बापट प्रत्यक्ष सहभागी झाले नव्हते. त्यांच्या घराबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात असून, कोणताही अनुचित प्रकार पुन्हा घडू नये यासाठी त्यांनी या मोर्चापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला.

पुण्यातील गणेशोत्सवात कर्णकर्कश डीजेला विरोध करून सामान्यांचा आवाज बनलेल्या विद्यानंद बापट यांच्यावर गुरुवारी (३ सप्टेंबर) टिळक रोडवर एका मुलाखतीदरम्यान हल्ला करण्यात आला होता. टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीवर मुलाखत सुरू असताना संतोष चव्हाण नावाच्या व्यक्तीने बापटांवर अचानक हल्ला केला. उपस्थित नागरिकांनी हल्लेखोराला रोखण्याचा प्रयत्न केला तरीही त्याने पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली असून बापट यांना पोलीस संरक्षण दिले आहे. या हल्ल्यानंतर राज्यभरातून बापट यांच्या भूमिकेला जोरदार पाठिंबा मिळत आहे.

पुणे महापालिकेच्या गणेशोत्सवपूर्व बैठकीत विद्यानंद बापटांनी डीजेच्या कर्णकर्कश आवाजाविरोधात आवाज उठवला होता. आपला गणेशोत्सवाला विरोध नसून केवळ कानठळ्या बसवणाऱ्या डीजेला विरोध असल्याचे त्यांनी वारंवार स्पष्ट केले आहे. मात्र, या भूमिकेमुळे डीजेच्या माध्यमातून गोंधळ घालणाऱ्या घटकांकडून त्यांना विरोध होत असून, पुणेकरांनी मात्र या अन्यायाविरोधात एकजूट दाखवली आहे.