मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMC च्या तिजोरीतून 25 लाखांचा खर्च? स्थायी समितीतील ‘तो’ प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात

मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMC च्या तिजोरीतून 25 लाखांचा खर्च? स्थायी समितीतील ‘तो’ प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईच्या महापौरांच्या अधिकृत बंगल्यावरील खर्चाच्या मुद्यावरून अलीकडेच राजकारण तापलं होतं. आता पुन्हा एकदा मुंबईच्या महापौर रितू तावडे वेगळ्या कारणामुळे चर्चेत आल्या आहेत. मुंबईच्या महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी मुंबई महानगरपालिका तब्बल 25 लाख रुपये खर्च करणार असल्याची माहिती आहे.

महापौरांचं सोशल मीडिया अकाउंट सांभाळण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीमध्ये आज, 19 ऑगस्ट रोजी प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. महापौरांच्या प्रसिद्धीसाठी एक वर्षाच्या कालावधीसाठी निविदा मागवण्याचा प्रस्ताव आजच्या स्थायी समितीच्या बैठकीत मांडला जाणार आहे. त्यामुळे या प्रस्तावावरून पुन्हा महापौर रितू तावडे यांच्यावर टीका होण्याची आणि नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका वर्षाच्या प्रसिद्धीसाठी 25 लाखांहून अधिक रुपये खर्च करण्यात येणार आहेत. 1 ऑगस्ट 2026 ते 31 जुलै 2027 या एक वर्षाच्या कालावधीसाठी 25 लाख 12 हजार 786 रुपये मुंबई महानगरपालिका महापौरांच्या प्रसिद्धीसाठी खर्च करणार असल्याची माहिती आहे.मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 मधील कलम 69 क च्या सुधारित तरतुदीनुसार स्थायी समितीमध्ये महापौरांच्या प्रसिद्धीसाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत.

दरम्यान, याआधी महापौरांचा जनसंपर्क सांभाळण्यासाठी काढण्यात येणाऱ्या निविदेवरून जोरदार टीका झाली होती. त्यानंतर आता सोशल मीडिया प्रसिद्धीसाठीही निविदा मागवण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबईच्या महापौरांकडून सातत्याने वारेमाप खर्च केला जात असल्याचा आरोप करत विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.अशातच या नव्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा मुंबईचं राजकारण तापण्याची शक्यता आहे. तसेच विरोधक महापौर रितू तावडे यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, गणपती आगमनादरम्यान ड्रोन उडवून चित्रीकरण करणाऱ्यांवर आता कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांनी यासंदर्भात माहिती देत ड्रोन उडवून चित्रीकरण करणाऱ्यांना इशारा दिला आहे.गणपती आगमन सोहळ्यादरम्यान ड्रोन उडवताना आढळणाऱ्यांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम 223 अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. तर काळाचौकी परिसरात महागणपतीच्या आगमन सोहळ्यादरम्यान ड्रोनच्या मदतीने चित्रीकरण करणाऱ्या दोघांवर काळाचौकी पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यांच्याकडून 1.87 लाख रुपये किमतीचे दोन ड्रोन पोलिसांनी जप्त केले आहेत.अशातच आता मुंबईत विनापरवाना ड्रोन उडवण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.