एजन्सीबाहेर नागरिकांच्या रांगाच रांगा; सिलिंडरसाठी धाव
रायगड (प्रतिनिधी) : आखाती देशातील इराण–अमेरिका, इस्रायल युद्धजन्य तणावाच्या पार्श्वभूमीवर देशात गेल्या दोन दिवसांपासून इंधन आणि गॅस पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं चित्र आहे. कर्जतमध्ये गॅससाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे.युद्धजन्य परिस्थितीमुळे सध्या सर्वत्र इंधन तुटवडा सुरू असल्यानं एलपीजी इंधनसाठा कमी प्रमाणात होत आहे. विशेष म्हणजे गॅस बुकिंगच्या नियमातही शासनाने बदल केला असून आता 21 ऐवजी 25 दिवसांची वाट पाहावी लागेल.महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात नागरिकांनी माध्यमांतील वृत्त वाचून आणि आपल्या जवळीस गॅस एजन्सीमध्ये माहिती घेऊन संबंधित गॅस बुकींगसाठी रांगा लावल्याचं पाहायला मिळत आहे.

रायगडच्या जिल्ह्यातील कर्जतमध्ये नागरिकांनी भारत गॅस वितरण केंद्रावर सकाळपासून मोठी गर्दी केली. यासह विविध गॅस एजन्सीवरही नागरिक गर्दी करतानाचे चित्र आहे.घरगुती गॅस सिलेंडर मिळणार की नाही या भीतीपोटी अनेक नागरिक सिलेंडरच्या टाक्या घेऊन केंद्रावर रांगेत उभे राहिले आहेत. त्यामुळे, गॅस वितरकांचीही मोठी गोची झाली आहे.अचानक वाढलेल्या गर्दीमुळे केंद्रातील कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली असून गॅस वितरक एजन्सीकडून काळाबाजार होऊ नये म्हणू जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत.दरम्यान, कर्जतसारखीच परिस्थिती राज्यातील विविध तालुक्यात असून नागरिकांनी घरगुती गॅससाठी एजन्सीबाहेर रांगाच रांगा लावल्या आहेत.




