'काम बंद केलं तर पगारही बंद'; डॉक्टरांच्या संपावर मुंबई हायकोर्टाचे कठोर निर्देश

'काम बंद केलं तर पगारही बंद'; डॉक्टरांच्या संपावर मुंबई हायकोर्टाचे कठोर निर्देश

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडून सीसीएमपी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या बीएचएमएस डॉक्टरांना नोंदणी देण्याच्या प्रस्तावाविरोधात संपावर गेलेल्या डॉक्टरांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. डॉक्टरांनी संप तातडीने मागे घ्यावा, असे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत.

आम्ही तुमची बाजू ऐकून घेऊ, पण संप तातडीने मागे घेणे आवश्यक आहे. संप मागे घेतला तर आम्ही तुमची बाजू लवकर ऐकून घेऊ,असे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा, अशा शब्दांत न्यायालयाने डॉक्टरांना सुनावले.

दरम्यान, डॉक्टरांच्या संपावरून मुंबई उच्च न्यायालयाने मार्ड ची चांगलीच कानउघाडणी केली. न्यायालयाने डॉक्टरांनी संप करणे योग्य आहे का, असा सवाल उपस्थित केला. तसेच तुम्ही रुग्णांवर उपचार करण्यास नकार देत आहात का? अशी विचारणाही केली.

रुग्णांना सेवा न देणे योग्य वाटते का, असा प्रश्न उपस्थित करत हायकोर्टाने डॉक्टरांना संप मागे घेण्याचे निर्देश दिले. आम्ही तुमची बाजू ऐकून घेऊ, मात्र त्यासाठी आधी संप मागे घेणे गरजेचे आहे, असे न्यायालयाने म्हटले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 8 सप्टेंबर रोजी होणार आहे.

दरम्यान, मार्डने न्यायालयाकडे मागणी केली आहे की, सीसीएमपी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या बीएचएमएस डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची नोंदणी देण्याची प्रक्रिया अंतिम निर्णय होईपर्यंत स्थगित ठेवण्यात यावी.

यासोबतच निवासी डॉक्टरांच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणीही मार्डने केली आहे. अनेक बैठका आणि निवेदने देऊनही सरकारकडून ठोस निर्णय न झाल्याने आंदोलनाचा निर्णय घेतल्याचे मार्डकडून सांगण्यात आले होते.

दरम्यान, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या मते, सीसीएमपी पात्रता असलेल्या बीएचएमएस डॉक्टरांना आधुनिक वैद्यकीय पद्धतीसाठी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची नोंदणी देण्याचा प्रस्ताव हा रुग्णांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर विषय आहे. याच कारणामुळे या निर्णयाला विरोध करण्यासाठी डॉक्टरांनी संप पुकारला होता.