राजर्षी शाहूंनी धाडसी कृतीतून समाजपरिवर्तन घडवले ; जपानी शिक्षणतज्ज्ञ कुनिओ हारांकडून छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा गौरव

राजर्षी शाहूंनी धाडसी कृतीतून समाजपरिवर्तन घडवले ; जपानी शिक्षणतज्ज्ञ कुनिओ हारांकडून छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा गौरव


कोल्हापूर: "राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केवळ सामाजिक बदलाची चर्चा केली नाही, तर अत्यंत धाडसी निर्णय आणि प्रत्यक्ष कृतीतून समाजात क्रांतिकारक परिवर्तन घडवून आणले. त्यांचे जीवन, तत्त्वज्ञान आणि दूरदृष्टी आजच्या काळातही तितकीच प्रेरणादायी व मार्गदर्शक आहे," अशा शब्दांत जपानमधील प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ, उद्योजक आणि ‘हो-मे-आय-कू’ ग्रुपचे संस्थापक कुनिओ हारा यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा गौरव केला आहे.

शाहू महाराजांच्या इंग्रजी चरित्राचे वाचन अन् विशेष पत्र

कुनिओ हारा हे नुकतेच कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यादरम्यान ज्येष्ठ लेखक आणि राजर्षी शाहू अभ्यासक प्राचार्य डॉ. जे. के. पवार लिखित आणि प्रा. डॉ. दिग्विजय पवार यांनी अनुवादित केलेल्या ‘Rajarshi Shahu Maharaj: A Concise Biography’ या पुस्तकाची इंग्रजी आवृत्ती त्यांना भेट देण्यात आली होती. या पुस्तकाचे सखोल वाचन केल्यानंतर हारा यांनी प्राचार्य डॉ. जे. के. पवार यांना विशेष पत्र पाठवून पुस्तकातील विचार आणि शाहू महाराजांच्या कार्याविषयी आदर व्यक्त केला.

हारा यांनी पत्रात लिहिले, "हे पुस्तक मी अत्यंत बारकाईने वाचले. यातील प्रत्येक प्रकरणाने मला अंतर्मुख केले आणि खोलवर प्रेरित केले. हे केवळ एका राजाचे चरित्र नसून भावी पिढ्यांसाठी जतन केलेली एक अभ्यासपूर्ण कलाकृती आहे."

"खऱ्या नेतृत्वाचे लक्षण शाहू महाराजांच्या जीवनात!"

आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात शाहू महाराजांनी जपलेली करुणा, मानवी प्रतिष्ठा, सर्वसमावेशकता आणि शिक्षण ही मूल्ये अधिक महत्त्वाची ठरत असल्याचे कुनिओ हारा यांनी नमूद केले.

ते पुढे म्हणाले, "नेतृत्वाचा खरा उद्देश स्वतःचा गौरव करणे नसून इतरांसाठी संधी निर्माण करणे हा आहे. आपण समाजाला ज्या स्थितीत पाहिले, त्यापेक्षा अधिक चांगल्या स्थितीत तो पुढील पिढीच्या हाती सोपवणे, हेच खऱ्या नेतृत्वाचे लक्षण आहे आणि हेच शाहू महाराजांनी करून दाखवले."

जपानी शैक्षणिक संकल्पना अन् शाहू विचारांची सांगड

हो-मे-आय-कू’ आणि ‘कामी मेमो’ या शैक्षणिक संकल्पनांच्या माध्यमातून काम करणाऱ्या हारा यांना शाहू महाराजांच्या शैक्षणिक विचारांमध्ये आपल्या तत्त्वज्ञानाशी साधर्म्य आढळले. शिक्षणाने विद्यार्थ्यांना केवळ ज्ञान न देता चारित्र्य, आत्मविश्वास, करुणा आणि आशावादी दृष्टिकोन दिला पाहिजे, यावर त्यांनी भर दिला.

वाठार येथील 'अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स'ला दिलेल्या भेटीचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, एका शतकानंतरही शाहू महाराजांची दूरदृष्टी आजही शिक्षणतज्ज्ञ आणि विद्यार्थ्यांना प्रेरित करत आहे. काळाच्या सीमा ओलांडून पुढील पिढ्यांना मार्गदर्शन करणे हेच एका खऱ्या महान नेत्याचे लक्षण असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.