जंतरमंतर आंदोलनाला हिरवा कंदील; अभिजीत दिपकेंच्या आगमनानंतर कॉकरोच जनता पार्टीची जोरदार तयारी
मुंबई (प्रतिनिधी) : देशाच्या राजधानीत आज होणाऱ्या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले असून, कॉकरोच जनता पार्टी (CJP) ला जंतरमंतर येथे आंदोलन करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी परवानगी दिली आहे. अमेरिकेतून भारतात परतल्यानंतर पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी ही माहिती समर्थकांसोबत शेअर केली असून, आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

दिल्ली पोलिसांच्या परवानगीनुसार, शनिवारी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत जंतरमंतर येथे आंदोलन आयोजित करण्यात येणार आहे. परवानगी मिळाल्यानंतर अभिजीत दिपके यांनी सोशल मीडियाद्वारे समर्थकांना थेट जंतरमंतरवर पोहोचण्याचे आवाहन केले.अभिजीत दिपके दिल्ली विमानतळावर पोहोचताच समर्थकांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले. विमानतळाबाहेर पडताना त्यांच्या हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुस्तक दिसून आले. त्यानंतर ते पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेतून पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले.
आंदोलन शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने पार पडावे, यासाठी दिपके यांनी समर्थकांना विशेष सूचना दिल्या आहेत. "कोणत्याही प्रकारचा गोंधळ न करता आपल्या मागण्या संयमाने मांडाव्यात," असे त्यांनी सांगितले.कॉकरोच जनता पार्टीने शिक्षण क्षेत्रातील कथित गैरव्यवहार, परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या आंदोलनात देशभरातील विद्यार्थी आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली असून, जंतरमंतर आणि परिसरातील संवेदनशील भागांमध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. प्रमुख मार्गांवर तपासणी आणि वाहतूक नियंत्रणाची व्यवस्था करण्यात आली आहे.परवानगी मिळाल्यानंतर या आंदोलनाबाबतची उत्सुकता आणखी वाढली असून, आजच्या घडामोडींवर देशभरातील नागरिक आणि विद्यार्थ्यांचे लक्ष केंद्रित झाले आहे.




