MPSC चा भोंगळ कारभार सुरूच! मुख्य परीक्षेच्या गुणांमध्ये मोठी तफावत; 250 पैकी 2, 6 अन् 11 गुण, पारदर्शकतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह
मुंबई (प्रतिनिधी) : पेपरफुटीमुळे चर्चेत आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीच्या कारभाराबाबत आता पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत. राज्यसेवा परीक्षेच्या मुख्य परीक्षेच्या गुणांमध्ये मोठी तफावत असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. काही विद्यार्थ्यांना 250 पैकी अवघे 2, 6, 11 आणि 14 गुण मिळाले आहेत. तर काही विद्यार्थी मराठीच्या क्वालिफाईंग पेपरमध्येच नापास झाले आहेत. गुणांमधील ही तफावत पाहता पेपर तपासणीमध्ये पारदर्शकता ठेवण्यात आली नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.

आयोगाकडून मुख्य परीक्षेसाठी यूपीएससीच्या धर्तीवर पहिल्यांदाच लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचे गुणही जाहीर करण्यात आले आहेत. मात्र, आता या गुणांवरही विद्यार्थ्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
औषध निरीक्षकपदाचा पेपर फुटल्याने आधीच आयोगाच्या कारभारावर टीका होत आहे. त्यातच इतर परीक्षांबाबतही शंका उपस्थित केल्या जात आहेत. आता राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या गुणांमध्ये मोठी तफावत समोर आल्याने आयोगाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.




