फडणवीसांच्या गुप्त बैठकीने राष्ट्रवादीत खळबळ! सुनेत्रा पवार नाराज?

फडणवीसांच्या गुप्त बैठकीने राष्ट्रवादीत खळबळ! सुनेत्रा पवार नाराज?

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा' निवासस्थानी झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजीची चर्चा सुरू झाली आहे.

मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यात बंद दाराआड बैठक झाल्याची माहिती समोर आली. मात्र, या बैठकीची माहिती पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच खासदार पार्थ पवार यांना आधी देण्यात आली नव्हती, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

यानंतर बुधवारी 'देवगिरी' निवासस्थानी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत सुनेत्रा पवार यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीबाबत थेट स्पष्टीकरण मागितल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, तटकरे यांनी आगामी पावसाळी अधिवेशनात मांडल्या जाणाऱ्या मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या पार्श्वभूमीवर कोणताही राजकीय गैरसमज होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही बैठक बोलावल्याचे स्पष्ट केले.मात्र, "असा महत्त्वाचा संदेश द्यायचा होता, तर पक्षाच्या अध्यक्षा म्हणून मला आधी का माहिती देण्यात आली नाही?" असा सवाल सुनेत्रा पवार यांनी बैठकीत उपस्थित केल्याची चर्चा आहे.

दरम्यान, या संपूर्ण घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं काय सुरू आहे, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मात्र, या बैठकीतील चर्चेचा अधिकृत तपशील अद्याप समोर आलेला नाही आणि या दाव्यांबाबत संबंधित नेत्यांकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.