'बावनकुळे साहेब, तुम्ही मराठ्यांच्या नादाला लागलात म्हणून रडकुंडीला येण्याची वेळ आली; एकदा माफ केलं, इथून पुढे व्यंग करणार नाही' : मनोज जरांगे पाटील
मुंबई (प्रतिनिधी) : राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे काल बोलताना भावुक झाले. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. यावेळी त्यांनी आपल्या कुटुंबाची कौटुंबिक पार्श्वभूमी सांगितली, तसेच आपल्या माऊलीचाही उल्लेख केला. पुढे बोलताना त्यांनी आपण मराठा समाजाच्या विरोधात नसल्याचंही स्पष्ट केलं.यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले की, बावनकुळे साहेब, मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की, माझं माझ्या मराठा समाजावर खूप प्रेम आहे. माझ्या समाजाच्या विरोधात मराठा असला किंवा इतर कोणीही आलं, तरी मी त्याला सोडत नाही. मात्र, तुम्ही इतके रडकुंडीला आलात कारण मी तुम्हाला गुडघे टेकायला लावतो.

मात्र, तुम्ही काल व्यथित झालात, याचं आम्हालाही वाईट वाटलं. बोलताना तुम्ही तुमच्या आईचंही नाव घेतलं. शेवटी आई ही आईच असते. आम्हालाही भावना आहेत आणि आमच्यावरही संस्कार आहेत. त्यामुळे आम्ही पहिल्यांदा तुम्हाला माफ करतो. इथून पुढे मी तुमच्यावर व्यंग करणार नाही, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर केलेल्या टीकेबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
दरम्यान, पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, चंद्रशेखर बावनकुळे तुम्ही रडकुंडीला आलात कारण तुम्ही मराठ्यांच्या नादाला लागलात. मला इतकं बोलण्याची गरजही नव्हती. तुम्ही परळीकर टोळीच्या नादाला लागलात. या टोळीच्या नादाला लागल्यामुळे तुमच्यावर रडकुंडीला येण्याची वेळ आली.त्यांचं ऐकून तुम्ही मराठ्यांच्या लेकरांचं वाटोळं करून मोठा अपराध केला. तुम्ही त्यांचं ऐकायला नको होतं, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.
आमच्यावर संस्कार आहेत. त्यामुळे आम्ही एकदा, दोनदा माफ करतो. पण इथून पुढे तुम्ही परळीच्या टोळीचं ऐकायचं नाही. त्यासोबतच रद्द केलेली चारही प्रमाणपत्रे येत्या 28 ऑगस्टच्या आत दुरुस्त करा. राजकीय दबावापोटी तुम्ही प्रमाणपत्रे रद्द केलीत. तुम्हाला जाहीरपणे सांगतो, रद्द केलेली चारही प्रमाणपत्रे 28 ऑगस्टच्या आत दुरुस्त करा. अन्यथा त्यानंतर मी कुणालाही सोडणार नाही, असा निर्वाणीचा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
मला सुद्धा आई आहे. मला सुद्धा भावना आहेत. माझ्यावरही संस्कार झाले आहेत. मी मराठ्यांचा आहे. आमचं वाईट केलं म्हणून आम्ही तुमच्या मागे लागलो. आम्ही कुणाच्या वाट्याला जात नाही. काल तुम्ही रडकुंडीला आलात, ते केवळ मराठ्यांच्या नादाला लागल्यामुळे आलात, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.
एवढ्या वेळेला मी तुम्हाला माफ करून देतो. मात्र, इथून पुढे अशी चूक करू नका. मी इथून पुढे अशा प्रकारे व्यंग करणार नाही. तुमचं तुमच्या आईवर जेवढं प्रेम आहे, तेवढंच प्रेम माझंही तुमच्या आईवर आहे. आम्ही भावनिक लोक आहोत. मात्र, आमच्या लेकरांच्या अन्नात विष कालवल्यावर आम्ही कुणाला सोडू शकणार नाही.त्यामुळे तुम्ही केलेली चूक 28 ऑगस्टच्या आत दुरुस्त करा. माझ्यासह माझ्या मराठा समाजाकडून आम्ही तुम्हाला माफ केलं, असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.




