भाजपकडून पूर्वसूचनेशिवाय प्रस्ताव तहकूब; शिवसेनेकडून आरोपांसह इशारा, मुंबई महापालिकेत सत्ताधाऱ्यांमध्येच कलगीतुरा
मुंबई (प्रतिनिधी) : सध्या मुंबई महानगरपालिकेवर भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची सत्ता आहे. मात्र, या दोन्ही सत्ताधारी पक्षांमध्ये सगळं काही आलबेल नसल्याचं चित्र दिसत आहे. कारण भाजप आणि शिंदेसेनेतील अंतर्गत कुरघोड्या सुरूच असल्याचं समोर आलं आहे. शिंदेसेनेकडे असलेल्या सुधार समितीच्या कामकाजाबाबत भाजप नगरसेवकांनी तक्रारी केल्यानंतर आता शिंदेसेनेकडूनही भाजपविरोधात तक्रार करण्यात आली आहे. शिंदेसेनेच्या प्रतिनिधींचे प्रस्ताव सभागृहात पूर्वसूचनेशिवाय न वाचताच भाजपकडून तहकूब केले जात असल्याचा आरोप शिंदेसेनेकडून करण्यात आला आहे.

दरम्यान, सुधार समितीच्या अध्यक्ष संध्या दोशी यांचे पती विपुल दोशी हे सुधार समितीच्या कामकाजात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप भाजप नगरसेवकांनी केला होता. मात्र, याबाबत भाजप नगरसेवकच विपुल दोशी यांच्याकडे मार्गदर्शनासाठी येतात आणि ते समितीच्या बैठकीत कुठेही उपस्थित नसतात, असं स्पष्टीकरण संध्या दोशी यांनी दिलं आहे.
सोबतच, भाजपच्या सभागृह नेत्यांकडूनच प्रस्ताव पूर्वसूचनेशिवाय तहकूब करण्याच्या प्रकारावर संध्या दोशी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ स्किल डेव्हलपमेंट हा शासकीय कामकाजाशी संबंधित प्रस्ताव पूर्वसूचना न देता सभागृह नेते गणेश खणकर यांनी तहकूब केल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे.याबाबत गटनेते अमेय घोले आणि सभागृह नेते गणेश खणकर यांना संध्या दोशी यांनी पत्र दिलं आहे. या प्रकरणावर सभागृह नेते गणेश खणकर यांनी स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे.
तसंच, महापौर, सभागृह नेते आणि गटनेत्यांनी या प्रकरणात लक्ष घालावं, अशी मागणीही संध्या दोशी यांनी केली आहे. पुन्हा अशा प्रकारच्या घटना घडल्यास हा माझ्या पदाचा आणि पक्षाचा अवमान समजून सभात्याग करणं योग्य ठरेल, असा इशाराही त्यांनी पत्रातून दिला आहे. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची तब्बल 25 वर्ष सत्ता होती. मात्र, यावेळी त्यांना मोठा फटका बसला असून भाजपने जोरदार मुसंडी मारली. त्यांना शिवसेना शिंदे गटाची साथ मिळाल्याने मुंबई महापालिकेत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची सत्ता स्थापन झाली आहे.
मात्र, सत्ता स्थापन झाल्यापासून भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये सगळं काही सुरळीत असल्याचं चित्र दिसत नाही. सातत्याने विविध मुद्द्यांवरून दोन्ही पक्षांमध्ये कुरघोड्यांचं राजकारण सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत.आता प्रस्ताव तहकूब करण्याच्या मुद्द्यावरून शिंदेसेनेने भाजपला थेट इशारा दिल्याने मुंबई महापालिकेतील सत्ताधारी पक्षांमधील हा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.




