क्राइम पेट्रोल' पाहून बनला सराईत चेन स्नॅचर; पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पुण्यात आरोपीला केले जेरबंद

क्राइम पेट्रोल' पाहून बनला सराईत चेन स्नॅचर; पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पुण्यात आरोपीला केले जेरबंद

पुणे (प्रतिनिधी) : 'क्राइम पेट्रोल' हा लोकप्रिय टीव्ही शो पाहून पोलिसांना चकमा देण्याचे डावपेच शिकलेल्या एका सराईत चेन स्नॅचरला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी थरारक कारवाईत अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सुमित इंगले असून तो सोलापूरचा रहिवासी आहे. गेल्या दीड-दोन महिन्यांपासून त्याने पिंपरी-चिंचवड शहरासह परिसरात चेन स्नॅचिंगच्या घटना घडवून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले होते. या कारवाईची माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त सारंग आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शहरात वाढत्या चेन स्नॅचिंगच्या घटनांमुळे आरोपीचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले होते. सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका ताज्या गुन्ह्यानंतर तपासाची जबाबदारी गुन्हे शाखा युनिट-1 कडे सोपवण्यात आली. तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळ आणि संशयिताच्या संभाव्य मार्गांवरील तब्बल 150 ते 200 सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. त्यातून आरोपी प्रत्येक गुन्ह्यानंतर बाणेरच्या दिशेने पळ काढत असल्याचे आणि बाणेर-पुणे महामार्गाचा वापर करत असल्याचे उघड झाले.

ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सलग तीन ते चार दिवस महामार्ग परिसरात गुप्त पाळत ठेवली. गुन्हे शाखेचे कर्मचारी वेशांतर करून विविध ठिकाणी तैनात करण्यात आले होते. अखेर सकाळच्या सुमारास संशयित आरोपी पोलिसांच्या नजरेस पडला. तो एका बंद रस्त्याकडे वळताच आधीपासून सज्ज असलेल्या पोलिसांनी त्याला चारही बाजूंनी घेरत ताब्यात घेतले. या संपूर्ण कारवाईचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस पथकाचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्तांनी दिली.

पोलीस चौकशीत सुमित इंगले हा सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. 2016 ते 2024 या कालावधीत तो सक्रिय होता आणि त्याच्यावर पुणे शहर, पुणे ग्रामीण तसेच पिंपरी-चिंचवड परिसरात एकूण आठ गुन्हे दाखल आहेत. तुरुंगातून सुटल्यानंतर त्याने सामान्य आयुष्य जगण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, जुगाराच्या व्यसनामुळे तो कर्जाच्या विळख्यात अडकला आणि पुन्हा गुन्हेगारीकडे वळला. चौकशीदरम्यान आरोपीने 'क्राइम पेट्रोल'चे काही भाग पाहून पोलिसांच्या हालचालींपासून बचाव करण्याचे आणि चेन स्नॅचिंग अधिक नियोजनबद्ध पद्धतीने करण्याचे तंत्र शिकल्याची कबुली दिली.