मनोज जरांगेंना प्रत्येक उपोषणावेळी ‘ती’ लाल गोधडीच का? त्यात काय दडलंय? लक्ष्मण हाकेंची चौकशीची मागणी
मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. एका बाजूला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस असून, त्यांनी मराठा समाजाला गनिमी काव्याने मुंबईत पोहोचण्याचं आवाहन केलं आहे. तर दुसऱ्या बाजूला ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी मुंबईच्या दिशेने ‘महा एल्गार मोर्चा’ काढण्याची घोषणा केली आहे.पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली असली, तरी लक्ष्मण हाके मुंबईला जाण्यावर ठाम आहेत. लक्ष्मण हाके मुंबईच्या दिशेने निघाले असून, आज त्यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. काल लक्ष्मण हाके यांनी १५ किलोमीटर अंतर चालत पूर्ण केलं.

याबाबत बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले, १५ किलोमीटर चालायची काही नाही. पण आता एक पाऊल उचलतोय, दुसरं पाऊल उचलतोय. बघूया आता. काल स्पीड जास्त होता, पण आज स्पीड कमी होईल. फिजिकली मर्यादा आहेतच ना माणसाला. १५ किलोमीटर, ज्यावेळी २० किलोमीटर आपण उन्हातून सातत्याने चालतो... आपण चालत राहणार आहोत.
दरम्यान, पत्रकारांनी ‘तुम्ही गाडीने जाणार होतात, तुम्ही वेळ काढूपणा करताय?’ असा सवाल केला. त्यावर लक्ष्मण हाके म्हणाले की, नाही, नाही, वेळ काढूपणा काय? मुंबईला गेलं तरी परवानगी नाहीच. इथून रस्त्यानं चालत जातानाही परवानगी नाहीच. पण आम्ही आमचा आवाज... तुम्ही आहात ना आमच्याबरोबर. त्यामुळे आम्ही आवाज या सरकारच्या कानावर घालतोय ना. आम्ही जाणारच आहोत मुंबईला, त्यात काय वाद नाही.
काल आम्ही १५-२० किलोमीटर चालू शकतो, तर आज पण चालणार आम्ही, असंही पुढे लक्ष्मण हाके म्हणाले.दरम्यान, मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. याबाबत लक्ष्मण हाके यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, "पाचवा नाही, ते १० दिवस पण करतात ना उपोषण! त्यांची ती लाल गोधडी आणि त्यांचं ते उपोषण... प्रत्येक उपोषणाला ती लाल गोधडीच का लागते? यामध्ये त्यांचं उपोषण आणि उपोषणामागचं..."
पुढे हाके म्हणाले, "जे डिफेंडर गाडीमधून फिरायला 'मी फिरू शकतो' असं म्हणतो, तो काय उपोषण प्रामाणिकपणे करणार ओ? प्रश्नच नाही! शासनाकडे रिपोर्ट आहेत, ब्लड रिपोर्ट आहेत. शासकीय अधिकाऱ्यांचा दावा आहे असा, आरोग्य अधिकाऱ्यांचा."उपोषण करणाऱ्या व्यक्तीच्या ब्लड टेस्ट, युरीन टेस्ट यामधून ग्लुकोज वगैरेबाबत माहिती समोर येते, असंही लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे. त्यामुळे त्याचीही एकदा चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
मनोज जरांगे वारंवार जे आंदोलन करतात, ते कसं करतात? लाल गोधडीमागे दडलंय काय? असा सवालही लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला आहे.तसंच, उपोषण नावाचं महात्मा गांधींचं लोकशाहीमधील सगळ्यात प्रभावी आंदोलन होतं, ते आंदोलन मनोज जरांगे यांनी बदनाम केलं, असा आरोपही लक्ष्मण हाके यांनी केला आहे.




