'जरांगे, तुझी नौटंकी फार झाली; आता बास!' लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगेंना थेट इशारा, म्हणाले- 'मीही मेंढपाळाचा पोर'
मुंबई (प्रतिनिधी) : ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. तीन ते चार तरुणांनी हॉटेलमध्ये हाके यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर ओबीसींच्या न्यायासाठी लक्ष्मण हाके यांनीही आंदोलन केलं आहे. या घटनेनंतर बोलताना लक्ष्मण हाके यांनी आपल्यावर झालेला हल्ला हा भ्याड आणि पूर्वनियोजित असल्याचा आरोप केला. दारू प्यायलेल्या चौघांनी काल ठरवून हा प्रकार केल्याचं ते म्हणाले. मात्र, अशा भ्याड हल्ल्यांना ओबीसी घाबरणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

"मनोज जरांगे, गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्र तुझी नौटंकी पाहतोय. आता फार झालं. मीही मेंढपाळाचा पोर आहे, तुझ्या अशा भ्याड हल्ल्याला मी घाबरत नाही. आरक्षण पाहिजे असेल तर त्यासाठी कायद्याचा कीस पाडावा लागतो," अशा शब्दांत लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधला. काल वडीगोद्रीहून येताना मोहोळजवळील निसर्ग हॉटेलमध्ये रात्री जेवण्यासाठी थांबले असताना काही कार्यकर्त्यांनी हाके यांना अडवून धक्काबुक्की केल्याची माहिती आहे. हे सर्व कार्यकर्ते लातूर जिल्ह्यातील असल्याचं हाके यांनी सांगितलं. त्यांनी ठरवून मोहोळजवळ हा प्रकार केल्याचा आरोपही त्यांनी केला.
हे कार्यकर्ते दारू प्यायलेले होते, असंही हाके यांनी सांगितलं. त्यांच्यासोबत असलेल्या पोलिसांनी संबंधित तरुणांना ताब्यात घेतलं असून, त्यांच्याविरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं."पाच तासांचा प्रवास करून येताना आम्ही कुठे थांबायचं नाही का? ओबीसी नेत्यांनी पोलीस संरक्षणातच फिरायचं का?" असा सवाल करत हा गृह खात्याचं अपयश असल्याची टीका लक्ष्मण हाके यांनी केली.
मनोज जरांगे यांना सोलापूर जिल्ह्यातील अभिजीत पाटील, शहाजी पाटील यांच्यापासून ते रोहित पवार, शरद पवार आणि भाजपचे सुरेश धस, नारायण कुचे यांच्यापर्यंत अनेक नेत्यांचा पाठिंबा असल्याचा दावा हाके यांनी केला. या सर्वांचीही वेळ येईल, असा इशाराही त्यांनी दिला. पुढे घटनेबाबत सविस्तर माहिती देताना लक्ष्मण हाके म्हणाले की, काल वडीगोद्रीहून बीडमार्गे, सोलापूरमार्गे सांगोल्याकडे जात असताना रात्री साधारण 9 वाजता ते निसर्ग हॉटेलमध्ये जेवायला थांबले होते.
त्यावेळी दारू प्यायलेल्या तीन ते चार जणांनी त्यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. "आम्हाला तुम्हाला जाब विचारायचा आहे, मनोज दादांना तुम्ही का विरोध करताय? तुमचा काय प्रॉब्लेम आहे?" अशा शब्दांत त्यांनी अरेरावी केल्याचं हाके यांनी सांगितलं.
त्यावेळी माझ्यासोबत पोलीस कर्मचारी आणि एसपी ऑफिसचे कर्मचारी होते. त्यांनी त्या तरुणांना बाजूला केलं आणि बाहेर नेलं. त्यानंतर आम्ही आत जेवण केलं. साधारण अर्ध्या तासाने बाहेर आल्यानंतर पुन्हा त्याच मंडळींनी गाडी अडवून स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पुन्हा शाब्दिक वाद आणि धक्काबुक्की झाली, असं हाके यांनी सांगितलं. हा जीवघेणा हल्ला करण्याच्या हेतूनेच ते तिथे आले होते, असा आरोपही त्यांनी केला. संबंधित तरुण पोलिसांच्या ताब्यात असून ते दारू प्यायलेले होते. रात्री एसपी साहेबांशीही आपला संवाद झाला असून मोहोळ पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याचं हाके यांनी सांगितलं.
मनोज जरांगे यांच्यावर टीका करताना लक्ष्मण हाके म्हणाले की, ओबीसींचा आवाज दाबण्याचा आणि ओबीसींच्या बाजूने बोलणाऱ्या कार्यकर्त्यांवर, पत्रकारांवर हल्ले करण्याचा हा प्रकार आहे. संविधान आणि हक्क-अधिकाराची भाषा करणाऱ्यांविरोधात मनोज जरांगे यांचं फ्रस्ट्रेशन असल्याचा आरोप त्यांनी केला. मनोज जरांगे यांना कुठेतरी नैराश्य आलं आहे. आता मंत्री आणि अनेक नेते त्यांच्या विरोधात बोलू लागले आहेत. त्यांच्या वक्तव्यांवर टीका होत आहे. त्यामुळे हे त्यांचं फ्रस्ट्रेशन असल्याचं हाके यांनी म्हटलं.
मात्र, अशा प्रकारे हाणामारी करून किंवा एखाद्याचा जीव घेऊन आरक्षण मिळवता येत नाही. त्यासाठी कायद्याचा अभ्यास करावा लागतो आणि सामाजिक मागासलेपण सिद्ध करावं लागतं, असं लक्ष्मण हाके यांनी स्पष्ट केलं. "मनोज जरांगे, तू कोणाच्या नादाला लागतोयस हे लक्षात ठेव. तू एका मेंढपाळाच्या पोराच्या नादी लागण्याच्या भानगडीत पडू नकोस. तुला पाठिंबा देणाऱ्यांचंही राजकारण संपेल आणि तुझं काय होईल, याचा तू विचार कर," असा थेट इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला.
ही लोकशाही आहे आणि इथे संविधान आणि कायदा चालतो. कोणाचा जीव घेऊन किंवा कोणावर हल्ला करून आरक्षण घेता किंवा देता येत नाही. त्यामुळे लोकशाहीच्या मार्गाने वागा, असं आवाहनही त्यांनी केलं."राजे-रजवाडे, बघून घेईन, 96 कुळी, आम्ही क्षत्रिय." अशी दादागिरी महाराष्ट्राला वेठीस धरण्याच्या भानगडीत पडू नका. गेली दोन-तीन वर्ष महाराष्ट्र हे सगळं सहन करतोय. आता बस्स, अशा शब्दांत लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांना इशारा दिला.




