१०वीचा निकाल रखडला; हजारो विद्यार्थी अजूनही प्रतीक्षेत, बोर्ड मौन
पुणे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 8 मे रोजी इयत्ता दहावीचा ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला. मात्र अजूनही अनेक विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता आला नाही. पुणे विभागीय मंडळात 117 विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवण्यात आला होता. या विद्यार्थ्यांना मोबाईलवरून व्हाट्सअप वर ऑफलाइन पद्धतीने निकाल सांगावा लागला. त्यामुळे राज्य मंडळातील कर्मचाऱ्यांना निकालाच्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत कार्यालयात बसून काम करावे लागले.

कॉपी केस, परीक्षेदरम्यान गैरप्रकार किंवा इतर कारणांमुळे विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवला जाऊ शकतो. मात्र कोणताही गैरप्रकार किंवा परीक्षेच्या नियमांचा भंग केलेला नसताना शेकडो विद्यार्थ्यांचा निकाल राज्य मंडळाने राखीव ठेवला. निकाल पाहता येत नसल्यामुळे विद्यार्थी सध्या तणावाखाली आहेत. त्यांचे पालकही हदबल आहेत. शाळेकडे याबाबत संपर्क साधला असता शाळेकडेही या संदर्भातील कोणतेही उत्तर नसल्यामुळे आता काय करावे, असा पालकांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे.
याबाबत बोलताना पुण्यातील भोसरी येथील रहिवासी संदीप थोरात म्हणाले की, माझ्या मुलीचा निकाल अद्याप लावण्यात आलेला नाही. आज ४ दिवस उलटले मात्र आम्हाला काहीच बोर्डाकडून कल्पना देण्यात आलेली नाही. आम्हाला नातेवाईक माझ्या मुलीला तिच्या मैत्रिणी सतत निकालाबाबत विचारत आहे. मुंबई विभागीय मंडळातून परीक्षा दिलेली आकांक्षा नाईक हिच्या वडिलांनी एबीपी माझाशी फोनवरून बोलताना प्रतिक्रिया दिली की ४ दिवस उलटून गेले निकाल न दिसल्याने आमची मुलगी आकांक्षाने जेवण सोडले आहे. आम्हाला बोर्डाकडून सोमवारी याबाबत आपल्याला माहिती देऊ असं आश्वासन दिलं आहे.
जेजुरी येथील रहिवासी आणि जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी श्रेया वाईकर हिचा देखील निकाल अद्याप मिळालेला नाही. बोर्डाकडून देखील कोणतच उत्तर न मिळाल्यामुळे याबाबत कुणाला विचाराव असा प्रश्न श्रेयाचा पालकांना पडला आहे. याबाबत मुंबई मंडळांचे प्रमुख दिपक माळी यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याकडून कोणतं उत्तर मिळाल नाही.
माझ्या बहिणीचा निकाल अद्याप लागलेला नाही. आम्ही बोर्डाच्या अधिकाऱ्यांना भेटून आलो २ दिवसांत निकाल लागेल म्हणाले, मात्र अद्याप ४ दिवस उलटले आज पाचवा दिवस आहे तरी देखील निकाल लागलेला नाही, अशी माहिती श्रीनाथ वाईकर ( एका १० च्या विद्यार्थिनींचा भाऊ ) जेजुरी यांनी दिली आहे.




