सुनेत्रा पवारांना प्रत्येक निर्णयाची माहिती असते; पक्षात कोणताही गैरसमज नाही – सुनील तटकरे

सुनेत्रा पवारांना प्रत्येक निर्णयाची माहिती असते; पक्षात कोणताही गैरसमज नाही – सुनील तटकरे

मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)मध्ये कोणताही अंतर्गत वाद किंवा गैरसमज नसल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला आहे. पक्षाच्या विलिनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चाही त्यांनी फेटाळून लावत, शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांच्यासोबत कोणतीही भेट झालेली नसल्याचे स्पष्ट केले.

सुनील तटकरे म्हणाले, पक्षातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींची माहिती सुनेत्रा पवार यांना नेहमी दिली जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीबाबत त्यांना अंधारात ठेवण्यात आल्याच्या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे त्यांनी सांगितले. "आमच्यात उत्तम समन्वय आहे. आम्ही सुनेत्रा पवारांना सर्व गोष्टी सांगतो," असेही ते म्हणाले.

विलिनीकरणाच्या चर्चांबाबत बोलताना तटकरे म्हणाले की, त्या पूर्वी झाल्या होत्या, मात्र आता त्या पूर्णपणे थांबल्या आहेत. तसेच मुख्यमंत्री किंवा इतर नेत्यांसोबत होणारी प्रत्येक भेट राजकीयच असते असे नाही; अनेकदा त्या मतदारसंघातील विकासकामांशी संबंधितही असतात, असे त्यांनी स्पष्ट केले.

डिलिमिटेशन विधेयकावर बोलताना त्यांनी सांगितले की, त्यांनी या विधेयकाच्या समर्थनार्थ मतदान केले आहे. मात्र त्याचा अर्थ एनडीएसोबत राजकीय भूमिका घेतली, असा होत नाही. इतर पक्षांनी त्याला पाठिंबा द्यायचा की नाही, हा त्यांचा स्वतंत्र निर्णय असल्याचेही त्यांनी नमूद केले.

याशिवाय, रविवारी दिल्लीत पार्थ पवार आणि प्रफुल पटेल यांच्यासोबत बैठक होणार असून, सच्चिदानंद सिंह यांनी पाठवलेल्या नोटीसला उत्तर द्यायचे की नाही, यावर अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहितीही सुनील तटकरे यांनी दिली.