जिजाऊ ब्रिगेड कोल्हापूरच्यावतीने मातृदिन उत्साहात साजरा
कोल्हापूर (प्रतिनिधी): राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून, जिजाऊ ब्रिगेड कोल्हापूरच्या वतीने १० मे २०२६ रोजी 'मातृदिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जीवाबा नाना जाधव पार्क, दत्तोबा शिंदे नगर येथील किड्स फोर्ट प्ले स्कूलमध्ये हा हृदयस्पर्शी सोहळा संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा चारुशीला पाटील यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी आपल्या भाषणात आईचे महत्त्व आणि जिजाऊंच्या संस्कारांची आजच्या पिढीला असलेली गरज अधोरेखित केली. यानंतर मराठा सेवा संघाचे संजय साळोखे आणि जिजाऊ ब्रिगेडच्या शहर कार्याध्यक्षा वनिता निंबाळकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मातृत्वाचा गौरव केला.
या दिनाचे औचित्य साधून उपस्थित मुलांनी आपल्या मातांना ओवाळून आणि त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन कृतज्ञता व्यक्त केली. आई आणि मुलांमधील हे भावनिक नाते पाहून उपस्थित सर्वजण भारावून गेले होते. याप्रसंगी सर्व मातांना व मुलांना अल्पोपहार, फळे आणि दुधाचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सांगतेवेळी शहराध्यक्षा त्वरिता पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाला सुमन वागळे, दीपा कोकाटे, जयश्री जाधव, संगीता कदम, आर्या कांबळे, किरण घोटणे, दिपाली वाळे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.




