निदा खानला लपवल्याचं कसं उघड झालं? व्हॉट्सअ‍ॅप चॅटवर शिक्षा शक्य? TCS प्रकरणी ओवैसींचा सवाल

निदा खानला लपवल्याचं कसं उघड झालं? व्हॉट्सअ‍ॅप चॅटवर शिक्षा शक्य? TCS प्रकरणी ओवैसींचा सवाल

मुंबई (प्रतिनिधी) : नाशिकमधील बहुचर्चित टीसीएस धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगर येथून अटक करण्यात आली आहे. निदा खानला छत्रपती संभाजीनगरमध्ये लपवून ठेवण्यासाठी एमआयएमचे (MIM) नगरसेवक मतीन पटेल यांनी मदत केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. तर निदा खानला आश्रय दिल्याचा आरोप करत पोलिसांनी मतीन पटेल यांच्यावर गुन्हा दाखल केलाय. यावरून सध्या राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून सत्ताधाऱ्यांनी एमआयएमवर जोरदार हल्लाबोल केलाय. आता एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषद घेत या प्रकरणावर सविस्तर भाष्य केलंय.  

असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, टीसीएसचे स्टेटमेंट आपण पाहिले असेल. निदा खानचा एचआरशी कोणताही संबंध नव्हता. एफआयआर होण्यापूर्वी निदा खानची बदली झाली होती. काही लोक मीडिया ट्रायल करत आहे त्याचा आम्ही निषेध करतो. बुरखा घालणं कधीपासून बेकायदेशीर झालं? आमचा न्यायालयावर विश्वास आहे. निदा खानवरील आरोप टिकणार नाहीत. केवळ द्वेषापोटी आरोप केले जात आहेत. आरोप झाले म्हणजे शिक्षा झाली असं नाही. एमआयएमला टार्गेट करा, काहीही फरक पडत नाही, असे त्यांनी म्हटले. 

असदुद्दीन ओवैसी पुढे म्हणाले की, मुस्लिम समाजातील सुशिक्षित मुला-मुलींना त्रास देण्यासाठी हा कट रचला जात आहे. मुंबई रेल्वे बॉम्बस्फोट कोणी केला? किती लोक मारले गेले? आजपर्यंत ते परिवार हाल सोसत आहेत. मालेगाव बॉम्बस्फोट कोणी केले? आजपर्यंत तिथले परिवार हाल सोसत आहेत. जे लोक आठ-आठ वर्ष जेलमध्ये राहिले. जे लोक मेले त्यांना न्याय मिळाला नाही. ज्यांना जेलमध्ये टाकले त्यांनाही न्याय मिळाला नाही. या प्रकरणात असाच माहोल तयार करण्यात आला. पण नंतर काहीच झाले नाही. तुम्हाला न्याय हवा असेल तर मीडिया ट्रायल करू नका. मालेगाव आणि मुंबईमध्ये अनेक आयुष्य उद्ध्वस्त झालेत, असे देखील त्यांनी म्हटले. 

निदा खानला छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांनी आसरा दिल्यानंतर त्यांच्यावर नाशिक पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. याबाबत विचारले असता आजपर्यंत किती आमदार-खासदारांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. निदा खानला एमआयएमच्या नगरसेवकाने लपवलं हे कसं समजलं? असा सवाल असदुद्दीन ओवैसी यांनी उपस्थित केला. तर व्हॉट्सअॅप चॅटच्या आधारे शिक्षा होते का? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केलाय.