इंजिनिअर थकले, तंत्रज्ञानही अपयशी; मंदिर हटवलं, पण हनुमानाची मूर्ती जागची हलेना! पुजाऱ्यांनी सांगितलं कारण
मुंबई (प्रतिनिधी) : मध्य प्रदेशातील उज्जैनमधील हनुमानाच्या मंदिराची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. उज्जैनमधील कंठाल चौक ते छत्री चौक या मार्गाचे रुंदीकरण केले जात आहे. याच मदनलाल शर्मा मार्गावरील सती गेटजवळ, नई पैठ आणि छत्री चौकाजवळ हनुमानाची उभी मूर्ती असलेलं एक मंदिर आहे. हे मंदिर सुमारे 170 वर्षे जुने, म्हणजेच 1857च्या काळातील असल्याचे मानले जाते.

रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी हे मंदिर अन्यत्र हलवण्याची योजना महानगरपालिकेने आखली होती. 4 आणि 5 सप्टेंबर रोजी महानगरपालिकेच्या पथकाने मंदिराची वास्तू पाडण्यास सुरुवात केली. त्यानंतर भगवान हनुमानाची मूर्ती हलवण्याची वेळ आली. प्रशासनाकडून मूर्ती हलवण्याचे प्रयत्न करण्यात आले, मात्र हनुमानाची उभी मूर्ती इंचभरही हलली नाही. चार दिवसांत मूर्ती हलवण्याचे चारही प्रयत्न अयशस्वी ठरले.
मोठ्या क्रेन, जेसीबी आणि इतर आधुनिक यंत्रसामग्रीच्या मदतीने मूर्ती हलवण्याचा प्रयत्न करण्यात आला. हायड्रॉलिक यंत्रसामग्री आणि अन्य तांत्रिक पद्धतींचा वापर करूनही मूर्ती जागची हलली नाही. त्यामुळे इंजिनिअर आणि प्रशासनासमोरही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेनंतर मंदिराचे पुजारी महेश बैरागी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांचं म्हणणं आहे की, पूर्वी मंदिर स्थलांतराचा निर्णय त्यांच्या हातात होता. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. आता केवळ हनुमानजींच्या इच्छेनेच प्रतिमा हटवण्याचा निर्णय होऊ शकतो.
पूर्वी आपण मूर्ती हटवण्यास तयार होतो आणि मंदिराच्या स्थलांतराबाबत चर्चा झाली होती, असं पुजारी महेश बैरागी यांनी सांगितलं. मात्र आता भाविकांची वाढती गर्दी आणि त्यांच्या भावना पाहता, पुढील निर्णय केवळ बजरंगबलींच्या इच्छेनेच होईल, असं त्यांना वाटत आहे. पुजारी महेश बैरागी यांनी पुढे सांगितलं की, अत्यंत आवश्यक असल्यासच मंदिराचं स्थलांतर करण्यात यावं आणि त्यासाठी त्यांच्या काही अटी होत्या. मात्र त्यापैकी केवळ एका मागणीला मान्यता देण्यात आली आहे.
मंदिर ज्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात येणार आहे, त्या जागेची कागदपत्रं देण्यात यावीत, अशी त्यांची मागणी होती. मात्र अद्याप संपूर्ण कागदपत्रं देण्यात आलेली नाहीत. तसेच प्रतिमा हटवण्यापूर्वी प्रशासनाने त्यांना लेखी माहिती द्यावी, अशीही त्यांची अट होती. मात्र कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक येऊन प्रतिमा हटवण्याचं काम सुरू करण्यात आलं आणि त्यानंतर परिस्थिती बिघडल्याचं पुजारी महेश बैरागी यांनी सांगितलं.
उज्जैनमध्ये होणाऱ्या सिंहस्थ महाकुंभ 2028 च्या तयारीसाठी सध्या रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू आहे. कंठाल चौक ते छत्री चौक दरम्यान रस्ता रुंद करण्यात येत आहे. या कामाअंतर्गत सती गेटजवळ असलेलं सुमारे 170 वर्षे जुनं ऐतिहासिक ‘खडे हनुमान मंदिर’ स्थलांतरित करण्याचं काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. मंदिराची रचना हटवल्यानंतरही हनुमानाची सुमारे 8 फूट उंच उभी प्रतिमा जागेवरून हलवण्यात प्रशासनाला वारंवार अपयश आलं आहे. त्यामुळे ही घटना सध्या देशभर चर्चेचा विषय ठरत आहे. मंदिराशी संबंधित उपलब्ध कागदपत्रांनुसार, या मंदिराची स्थापना सुमारे 1857च्या काळात झाल्याचा दावा केला जातो. त्यामुळे मंदिराचा इतिहास साधारण 170 वर्षांहून अधिक जुना मानला जातो. आता प्रशासन मूर्ती हलवण्यात यशस्वी होतं का, की खडे हनुमानाची मूर्ती याच ठिकाणी कायम राहणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.




