शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार दोन मंत्र्यांसमोरच भावूक; निधी वाटपावरून महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर

शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार दोन मंत्र्यांसमोरच भावूक; निधी वाटपावरून महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर

मुंबई (प्रतिनिधी) : नंदुरबार जिल्ह्यात शिवसेनेला निधी वाटपाच्या असमान सूत्रावरून शिंदेंच्या शिवसेनेचे विधान परिषदेतील आमदार चंद्रकांत रघुवंशी भावूक झाले. अखेर दोन मंत्र्यांसमोरच चंद्रकांत रघुवंशी यांना रडू कोसळल्याचं पाहायला मिळालं. कार्यकर्त्यांची कामं करायची कशी?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावेळी मंत्री उदय सामंत आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोरच चंद्रकांत रघुवंशी यांच्या अश्रूंचा बांध फुटला. नंदुरबार जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपातील वाद आता थेट चव्हाट्यावर आला आहे. याच असमान निधी वाटपावरून शिवसेनेचे विधान परिषद आमदार चंद्रकांत रघुवंशी हे दोन शिवसेना मंत्र्यांसमोरच भावूक झाल्याचं चित्र समोर आलं आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील महायुतीमधील धुसफूस आता उघडपणे समोर आली असून, जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपाच्या ठरलेल्या सूत्रावरून आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी नाराजी व्यक्त केली. नाराजी व्यक्त करताना शिवसेनेच्या मेळाव्यात दोन मंत्र्यांसमोरच त्यांना रडू कोसळल्याचं पाहायला मिळालं. नंदुरबार जिल्ह्यात शिवसेनेचे सध्या विधानसभेचे आमदार आमश्या पाडवी आणि विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी असे दोन आमदार आहेत. अशातच नियोजन समितीच्या ठरलेल्या निधी वाटपाच्या सूत्रानुसार या दोन्ही आमदारांच्या वाट्याला अत्यल्प निधी येत असल्याचं रघुवंशी यांनी सांगितलं.

 यातून कार्यकर्त्यांची कामं करायची कशी?, असा सवाल करताना आमदार चंद्रकांत रघुवंशी भावनिक झाले. याच मुद्द्यावरून मंत्र्यांसमोरच त्यांना रडू कोसळलं. त्यामुळे याबाबत थेट वरिष्ठ पातळीवर पक्षनिहाय निधी देण्याची विनंती त्यांनी मंत्री उदय सामंत आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली. दरम्यान, नंदुरबार जिल्हा गुंतवणूक परिषदेत मंत्री उदय सामंत यांनी उद्योजकांशी संवाद साधला. जिल्ह्यातील औद्योगिक संधी, गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीच्या विविध शक्यतांवर यावेळी सविस्तर चर्चा झाली.

 या परिषदेत 123 सामंजस्य करार म्हणजेच MoU झाले असून, त्यातून 5004 कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित झाली आहे. या गुंतवणुकीतून 7778 रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. विशेषतः वस्त्रोद्योग क्षेत्रात 4787 कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित झाली आहे, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.