‘मनसेचे गुंड अंगावर धावून आले’; कृष्णराज महाडिकांचा आरोप, संजय राऊत म्हणाले, ‘बाळा, तू चुकीच्या पक्षात आहेस’
मुंबई (प्रतिनिधी) : मनसेचे नेते अमित ठाकरे पुण्यातील एका महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सुविधांची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेजवळ नरेंद्र मोदींचा फोटो लावण्यात आला होता. अमित ठाकरे यांनी या फोटोबाबत आक्षेप घेतल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी तो फोटो हटवला.या घटनेच्या विरोधात भाजप युवा मोर्चाकडून मुंबईतील मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याची मोहीम आखण्यात आली होती. मात्र, भाजपच्या आंदोलनाआधीच मनसेचे नेते आणि कार्यकर्ते शिवतीर्थाबाहेर पोहोचले.

त्यामुळे कृष्णराज महाडिक आणि भाजयुमोच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांच्या घरापर्यंत जाणं तर सोडाच, शिवाजी पार्कची वेसही ओलांडता आली नाही. त्यानंतर मनसे आणि भाजपच्या युवा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालं.मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. आम्ही शांतपणे आंदोलन करत होतो. त्यावेळी आमच्यावर मनसेचे गुंड आक्रमक झाले. आमच्यावर मारहाण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मनसेचे गुंड आमच्या अंगावर धावून आले. माझ्यावरही काही मुलं धावून आली. या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे, असं कृष्णराज महाडिक यांनी सांगितलं.
कृष्णराज महाडिक यांच्या या आरोपांवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक्सवर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. ‘बाळा, तू चुकीच्या पक्षात आहेस. ही मुंबई आहे. ती आजही शिवसेना, अस्सल मराठी माणूस आणि ठाकरेंचीच आहे. बाकी सगळे येतात आणि जातात,’ असं संजय राऊत यांनी कृष्णराज महाडिक यांना उद्देशून म्हटलं आहे.




