सुनील तटकरेंबाबत प्रशांत किशोरांनी नाराजी व्यक्त करताच जय पवारांचा एकच प्रश्न
मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)मध्ये सध्या अंतर्गत घडामोडींना वेग आला असून, नुकत्याच झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीतील माहिती आता समोर आली आहे. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कार्यपद्धतीबाबत थेट नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

मुंबईतील सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीला पार्थ पवार प्रत्यक्ष उपस्थित होते, तर जय पवार ऑनलाइन सहभागी झाले होते. बैठकीदरम्यान प्रशांत किशोर यांनी, आपण यापूर्वी दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी होत नसल्याची खंत व्यक्त केली. प्रदेशाध्यक्षांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसेल, तर महाराष्ट्रात प्रभावीपणे काम करणं कठीण असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
यावेळी जय पवार यांनी प्रशांत किशोर यांना एकच प्रश्न विचारला. महाराष्ट्रातील पक्ष नेतृत्वाबाबतच्या या सूचना तुम्ही आधीच का दिल्या नाहीत? असा त्यांचा सवाल होता. त्यावर प्रशांत किशोर यांनी, "यापूर्वी दोन-तीन बैठकींमध्ये आम्ही आवश्यक सूचना दिल्या होत्या. मात्र, त्यांची अंमलबजावणी झाली नाही," असं उत्तर दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, देवगिरी बंगल्यावर झालेली ही बैठक तब्बल पाच तास चालली. या बैठकीला प्रशांत किशोर यांच्यासोबत त्यांच्या टीममधील दोन सदस्यही उपस्थित होते. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षसंघटना आणि रणनीतीबाबत त्यांनी काही महत्त्वाच्या सूचना दिल्याचं सांगितलं जात आहे.
तसेच, "जोपर्यंत राज्यातील नेतृत्वासोबत समन्वयाने काम होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रात काम करणं अवघड आहे. गेल्या तीन बैठकींमधील सूचनांची अंमलबजावणी झाली नसल्याने भविष्यात माझ्याकडून काम अपेक्षित असेल, तर प्रदेशाध्यक्ष पदाबाबत निर्णय घ्यावा लागेल," अशी स्पष्ट भूमिका प्रशांत किशोर यांनी बैठकीत मांडल्याची माहिती समोर आली आहे.




