नाशिकच्या आदिवासी विद्यार्थ्यांना राहुल गांधींच्या कार्यालयातून फोन; दुपारी 2 वाजता भेट, नाशिकमध्ये राजकीय वातावरण तापणार?

नाशिकच्या आदिवासी विद्यार्थ्यांना राहुल गांधींच्या कार्यालयातून फोन; दुपारी 2 वाजता भेट, नाशिकमध्ये राजकीय वातावरण तापणार?

मुंबई (प्रतिनिधी) : नाशिकमधील आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन गेल्या 16 दिवसांपासून सुरू आहे. नाशिकच्या ईदगाह मैदानावर आदिवासी विद्यार्थ्यांचं हे आंदोलन सुरू असून, यापैकी तीन विद्यार्थी गेल्या 10 ते 12 दिवसांपासून आमरण उपोषण करत आहेत.आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी हजारो विद्यार्थ्यांनी काल म्हणजेच 1 सप्टेंबर रोजी नाशिकच्या आदिवासी विकास भवनावर मोर्चा काढला. प्रशासनाकडून विद्यार्थ्यांच्या मागण्यांचं निवेदन स्वीकारण्यात आलं आहे. तसंच सरकारकडूनही विद्यार्थ्यांसोबत सातत्याने चर्चा सुरू आहे. मात्र, अद्याप ठोस निर्णय झालेला नसल्याने विद्यार्थ्यांकडून आदिवासी मंत्री अशोक उइके यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.

आदिवासी मंत्री राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत आमरण उपोषण सोडणार नाही, अशी भूमिका आंदोलक विद्यार्थ्यांनी घेतली आहे. दरम्यान, आज दुपारी दोन वाजताच्या सुमारास राहुल गांधी यांच्यासोबत 10 ते 12 विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ भेट घेणार असल्याची माहिती आहे.दरम्यान, उद्या म्हणजेच 3 सप्टेंबर रोजी ठाकरे सेनेचे नेते आदित्य ठाकरे हे देखील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेणार आहेत. सरकारने दोन दिवसांत मागण्या मान्य न केल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आंदोलक विद्यार्थ्यांनी दिला आहे.

राहुल गांधी हे Gen-Z चे लीडर आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसंदर्भात आवाज उठवावा. आमच्या मागण्या स्पष्ट आहेत. त्यासाठी आम्ही सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करत आहोत. मात्र, त्यावर अद्याप ठोस निर्णय झालेला नाही.त्यामुळे आम्ही राहुल गांधी यांना विनंती करू. ते विरोधी पक्षनेते आहेत आणि त्यामुळे ते आमच्या प्रश्नावर आवाज उठवतील, अशी प्रतिक्रिया आंदोलक विद्यार्थ्यांनी दिली आहे. दुसरीकडे, राहुल गांधी यांच्या कार्यालयातून आंदोलक विद्यार्थ्यांना फोन आला असून, दुपारी दोन वाजताच्या सुमारास भेट होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

एकीकडे राहुल गांधी काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या निवासी शिबिराच्या समारोपासाठी नाशिकमध्ये येत असताना, दुसरीकडे भाजपकडून त्यांच्या दौऱ्याला विरोध दर्शवला जाणार आहे. नारी वंदन विधेयकाला काँग्रेसने विरोध केल्याच्या मुद्द्यावर नाशिक भाजपकडून निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर होणाऱ्या या आंदोलनात भाजपचे प्रमुख पदाधिकारी सहभागी होणार आहेत.

काँग्रेसने नारी वंदन विधेयकाला विरोध केल्याचा आरोप करत भाजपकडून काळे कपडे परिधान करून आणि काळ्या फिती लावून निषेध करण्यात येणार आहे. त्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी नाशिक दौऱ्यावर असतानाच भाजपकडून नारी वंदन विधेयकाच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात येणार असल्याने नाशिकमधील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.