मराठवाड्यात पावसासाठी धीरज देशमुखांचा ‘क्लाऊड सीडिंग’चा पर्याय; म्हणाले, ‘पावसाची वाट पाहण्यापेक्षा सरकारने.’
मुंबई (प्रतिनिधी) : ज्या ऑगस्ट महिन्यात मराठवाड्यात श्रावणसरींचा वर्षाव होतो, तोच महिना यंदा पावसाच्या अभावामुळे कोरडा गेला. सलग 31 दिवस पावसाचा पत्ता नसल्याने खरिपाची पिकं माना टाकू लागली आहेत. ऐन मोक्याच्या वेळी पावसानं ओढ दिल्याने निर्माण झालेली ही परिस्थिती थेट पीक उत्पादकतेवर परिणाम करणारी ठरणार आहे.या पार्श्वभूमीवर आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी लातूरसह संपूर्ण मराठवाडा आणि महाराष्ट्रातील दुष्काळसदृश भागांमध्ये क्लाऊड सीडिंग म्हणजेच कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याची मागणी सरकारकडे केली आहे.

काँग्रेस नेते आणि माजी आमदार धीरज देशमुख यांनी मराठवाड्यात क्लाऊड सीडिंगचा प्रयोग तातडीने राबवण्यात यावा, अशी मागणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्याकडेही त्यांनी ही मागणी केली आहे.मराठवाड्यात पावसानं पाठ फिरवल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पिकं वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. अशा परिस्थितीत केवळ पावसाची वाट पाहत बसण्यापेक्षा सरकारने उपलब्ध असलेल्या वैज्ञानिक आणि तांत्रिक पर्यायांचा तातडीने वापर करण्याची गरज असल्याचं धीरज देशमुख यांनी म्हटलं आहे.
क्लाऊड सीडिंग तंत्रज्ञानामुळे हमखास पाऊस पडेल, असा दावा करता येणार नाही. मात्र, योग्य हवामान आणि ढगांची परिस्थिती उपलब्ध असेल, तर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हा पर्याय नक्कीच तपासून पाहिला पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.शेतकरी संकटात असताना सरकारकडे उपलब्ध असलेला प्रत्येक वैज्ञानिक पर्याय वापरला गेला पाहिजे, अशी भूमिका धीरज देशमुख यांनी मांडली आहे. धीरज देशमुख यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत सरकारकडे ही मागणी केली आहे. ते म्हणतात की, पावसाळ्याचे तीन महिने संपले आहेत. मात्र मराठवाड्यामध्ये समाधानकारक पाऊस झालेला नाही. अनेक भागांमध्ये पिकांनी माना टाकल्या आहेत. लातूरच्या मांजरा धरणामध्ये देखील 13.5 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. दुष्काळाचं संकट शेतकऱ्यांसमोर उभं आहे.
अशा अडचणीच्या काळात सरकारनं आपल्या भागात कृत्रिम पावसाचा प्रयोग केला पाहिजे. अनेक ठिकाणी कृत्रिम पावसाच्या प्रयोगामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो, असं समोर आलं आहे.आपल्या हातात असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून आज आपण शेतकऱ्यांसाठी काय करतोय, हे सिद्ध करण्याची वेळ आली आहे. उर्वरित दिवसांमध्ये जिथे कुठे ढगाळ वातावरण असेल, त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळू शकतो का, याचा विचार झाला पाहिजे.
हा प्रयोग यशस्वी होईल किंवा नाही, हे सांगता येत नाही. पण आज काळाची गरज आहे की आपण शेतकऱ्यांसाठी काय करतोय, हे दाखवण्याची. शेतकरी आभाळाकडे बघतोय, मात्र पाऊस पडत नाहीये.त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांच्या वतीने मी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती करतो की, राज्य सरकारने तातडीने निर्णय घेऊन कृत्रिम पावसाचा प्रयोग महाराष्ट्रातील सर्व दुष्काळसदृश भागांमध्ये राबवावा, अशी मागणी धीरज देशमुख यांनी केली आहे.




