मालाडमध्ये महिला वकिलाला कारने उडवलं, चालक 15 हजारांच्या जातमुचलक्यावर बाहेर; आता भाजप नगरसेवक आक्रमक
मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील मालाड पश्चिमेकडील एस. व्ही. रोड आणि मामलेदारवाडी जंक्शनवर रविवारी एक भीषण अपघात झाला होता. सिग्नलवर थांबलेल्या स्कुटीसह तीन ऑटो रिक्षांना एका अनियंत्रित कारने जोरदार धडक दिली. या दुर्दैवी अपघातात स्कुटीवर मागे बसलेल्या 34 वर्षीय महिला वकील प्रियंका मयांक सत्रा यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचे पती आणि तीन रिक्षाचालकांसह सहा जण गंभीर जखमी झाले होते.या घटनेनंतर पोलिसांनी कार चालक 70 वर्षीय कृष्णा चमणकर याला अटक केली होती. मात्र, त्याला कोर्टात हजर केल्यानंतर 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मुक्त करण्यात आलं. या प्रकारामुळे संताप व्यक्त होत असतानाच आता या प्रकरणात मुंबईतील भाजप नगरसेवकाची एन्ट्री झाली आहे.

भाजपचे नगरसेवक प्रवीण छेडा यांनी या प्रकरणात मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांनी आरोपी कृष्णा चमणकर याला व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल व्हावा, तसंच आरोपीसह त्याला मदत करणाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रवीण छेडा यांनी केली आहे.
मयत प्रियंका सत्रा या प्रवीण छेडा यांच्या नातेवाईक आहेत. यासंदर्भात प्रवीण छेडा यांनी पोलीस आयुक्तांना पत्र दिलं आहे. तसंच आज ते मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांची भेट घेणार आहेत.या भीषण अपघातामुळे प्रियंका सत्रा यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रियंका सत्रा यांच्यावर अपघात झाल्याच्याच रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रियंका यांना आठ वर्षांची मुलगी आणि चार वर्षांचा मुलगा आहे. आईच्या अचानक जाण्याने दोन्ही मुलांनी धाय मोकलून रडत आपल्या भावना व्यक्त केल्या.
या अपघातात मयांक सत्रा हे देखील गंभीर जखमी झाले होते आणि त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, पत्नी प्रियंका यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी त्यांना शेवटचं पाहता यावं, यासाठी मयांक सत्रा गंभीर जखमी असूनही व्हिलचेअरवरून स्मशानभूमीत पोहोचले.हे भावनिक दृश्य पाहून स्मशानभूमीत उपस्थित असलेल्या अनेकांचे डोळे पाणावले होते.




