NEET पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; धनंजय लोखंडेच्या खास मित्राला अटक

NEET पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; धनंजय लोखंडेच्या खास मित्राला अटक

मुंबई (प्रतिनिधी) : वैद्यकीय प्रवेश परीक्षा 'यूजी नीट' पेपरफुटी प्रकरणाचा तपास आता वेगाने पुढे सरकत असून, या प्रकरणातील महत्त्वाचा धागा मानल्या जाणाऱ्या धनंजय लोखंडे  याच्या जवळच्या मित्राला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. ओंकार शिंगोटे असे या संशयित विद्यार्थ्याचे नाव असून, तो पुण्यातील वाघोली भागातील एका महाविद्यालयात आयुर्वेदिक अभ्यासक्रमाचे (BAMS) शिक्षण घेत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, ओंकार शिंगोटे याला बुधवारी अटक करण्यात आली आहे. संशयित धनंजय लोखंडे याचा ओंकार शिंगोटे अत्यंत जवळचा मित्र असल्याची माहिती समोर येत आहे. तर, धनंजय लोखंडे हा नीट पेपरफुटी प्रकरणाचा महत्त्वाचा धागा असल्याचे मानले जात असून, त्याने पुणे आणि नाशिक परिसरात आपले मोठे जाळे पसरवले होते. ओंकार हा लोखंडेच्या संपर्कात राहून या रॅकेटमध्ये नेमकी काय भूमिका बजावत होता? याचा तपास आता यंत्रणांकडून केला जात आहे.

यापूर्वी याच प्रकरणात पुण्यातील फुरसुंगी येथून सायबर सुरक्षा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी शेषराव सोळंकी आणि बिबवेवाडीतील ब्युटी पार्लर चालक मनिषा वाघमारे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच नाशिकमधून शुभम खैरनार यालाही अटक करण्यात आली आहे. धनंजय लोखंडे हा स्वतः पुण्याच्या वाघोली परिसरात राहून एजंट्समार्फत प्रश्नपत्रिका विकण्याचे रॅकेट चालवत होता. या रॅकेटमध्ये आता ओंकार शिंगोटेचे नाव समोर आल्याने वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचाच या घोटाळ्यात मोठा सहभाग असल्याचे पाहायला मिळत आहे. 

नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (NTA) घेण्यात आलेल्या या परीक्षेची प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले आहे. राजस्थान, हरियाणा आणि महाराष्ट्र अशा तीन राज्यांमध्ये या घोटाळ्याचे धागेदोरे पसरले आहेत. कुरिअरद्वारे प्रश्नपत्रिकांची देवाणघेवाण करून लाखो रुपयांचे व्यवहार झाल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. ओंकार शिंगोटेच्या चौकशीतून या रॅकेटमधील इतर आर्थिक व्यवहार आणि नवीन एजंट्सची नावे समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.