भाजप वाढविण्यापासून महाराष्ट्र घडविण्यापर्यंत एकनाथ खडसेंचं मोठं योगदान; अमृतमहोत्सवानिमित्त चंद्रकांत पाटलांची मुक्ताईनगरात सदिच्छा भेट, म्हणाले.
मुंबई (प्रतिनिधी) : एकनाथ खडसे हे झुंजार नेते आहेत. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष वाढविण्यामध्येच नव्हे, तर सामाजिक कार्यासह महाराष्ट्र घडविण्यातही एकनाथ खडसे यांचं मोठं योगदान राहिलं आहे, असं सांगत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना त्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

एकनाथ खडसे यांचा उद्या (30 ऑगस्ट) अमृतमहोत्सव सोहळा पार पडणार आहे. मात्र, उद्या पुण्यात आपल्याच मतदारसंघात दुसरा कार्यक्रम असल्यामुळे खडसे यांच्या अमृतमहोत्सवाला आपल्याला उपस्थित राहता येणार नाही. त्यामुळे आपण खडसे यांना आजच शुभेच्छा देण्यासाठी मुक्ताईनगर येथे आलो असल्याचं चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितलं. यावेळी त्यांच्या निरोगी आयुष्यासाठी आणि पुढील वाटचालीसाठी आपण त्यांना शुभेच्छा देत असल्याचं उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी म्हटलं आहे.
एकनाथ खडसे यांच्या अमृतमहोत्सवाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील दिग्गज नेते उपस्थित राहणार असले, तरी हा सोहळा राजकीय नसल्याचं अमृतमहोत्सव समितीचे अध्यक्ष अरुणभाई गुजराती यांनी म्हटलं आहे.
राजकारणात सत्ताधारी पक्षात असो किंवा विरोधी पक्षात, ज्यांनी आदर्शवत काम केलं, अशा एकनाथ खडसे यांचा अमृतमहोत्सव सोहळा येत्या 30 ऑगस्ट रोजी पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्यासह राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांना निमंत्रित करण्यात आलं आहे. या सर्वच नेत्यांनी खडसे यांच्या अमृतमहोत्सवाला उपस्थित राहण्याचं आश्वासन दिलं आहे.
दरम्यान, या अमृतमहोत्सव सोहळ्याला राज्यातील सर्वच पक्षांचे राजकीय नेते उपस्थित राहणार असले, तरी हा कार्यक्रम मात्र राजकीय नसल्याचं अमृतमहोत्सव सोहळा समितीचे अध्यक्ष अरुणभाई गुजराती यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे.दुसरीकडे, एकनाथ खडसे यांच्याकडून अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनाही आमंत्रण देण्यात आलं आहे. एकनाथ खडसे यांचे स्वीय सहाय्यक योगेश कोलते आणि सुनील नेवे यांनी जामनेरमध्ये घरी जाऊन मंत्री गिरीश महाजन यांना आमंत्रण पत्रिका दिली. हात जोडून आमंत्रण पत्रिका देत मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावं, अशी विनंतीही यावेळी करण्यात आली.
यावर 'सगळ्यांचा विषय वेगळा, माझा विषय वेगळा,' असं मंत्री गिरीश महाजन म्हणाले. 'सर्व नेते येत आहेत, तुम्ही देखील यावं. समितीमध्ये तुमचं नाव घेतो,' असंही यावेळी गिरीश महाजन यांना सांगण्यात आलं. मात्र, 'माझं नाव नको, तुम्हाला माहिती आहे,' असं उत्तर गिरीश महाजन यांनी दिलं.यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी सर्व पत्रिका उघडून पाहिल्या आणि तोंडी काही न बोलता मान डोलवत कार्यक्रमाला येण्याबाबत प्रतिसाद दिला. त्यामुळे आता मंत्री गिरीश महाजन या कार्यक्रमाला उपस्थित राहतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.




