'विद्यार्थी, मूर्ख आणि अंधभक्त' राहुल गांधींच्या वक्तव्याने लोकसभेत गदारोळ; भाजप खासदारांचा जोरदार आक्षेप

'विद्यार्थी, मूर्ख आणि अंधभक्त' राहुल गांधींच्या वक्तव्याने लोकसभेत गदारोळ; भाजप खासदारांचा जोरदार आक्षेप

मुंबई (प्रतिनिधी) : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी पेपरफुटी दुरुस्ती विधेयकावरील चर्चेदरम्यान केलेल्या एका वक्तव्यामुळे सभागृहात मोठा गदारोळ झाला. आपल्या भाषणात उपमा आणि रूपकांचा वापर करत राहुल गांधी म्हणाले की, या देशात तीन प्रकारचे लोक आहेत. एक विद्यार्थी, दुसरे मूर्ख आणि तिसरे अंधभक्त. या वक्तव्यानंतर भाजपच्या खासदारांनी तीव्र आक्षेप घेत घोषणाबाजी सुरू केली.

राहुल गांधी यांनी भाषणाच्या सुरुवातीला एका विद्यार्थिनीशी झालेल्या संवादाचा उल्लेख केला. ते म्हणाले, मी तिला विचारलं, विद्यार्थी म्हणजे काय? त्यावर ती म्हणाली, विद्यार्थी म्हणजे खुल्या मनाने आणि जिज्ञासेने नवीन गोष्टी शिकणारी व्यक्ती. त्यानंतर मी विचारलं, दुसऱ्या प्रकारात कोण येतात? ती म्हणाली, मूर्ख. त्यांना वाटतं त्यांना सगळं माहिती आहे, ते इतरांचं ऐकत नाहीत आणि स्वतःलाच सर्वज्ञ समजतात. तिसऱ्या प्रकारात अंधभक्त येतात, जे अशा मूर्ख लोकांनाच देव मानतात.

राहुल गांधींच्या या वक्तव्यावर भाजप खासदारांनी तीव्र विरोध दर्शवत, त्यांनी असंसदीय भाषा वापरल्याचा आरोप केला. यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधींना विधेयकापुरतेच मर्यादित राहण्याची सूचना केली. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनीही 'मूर्ख' आणि 'अंधभक्त' हे शब्द असंसदीय असल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर राहुल गांधी म्हणाले, "मी कोणत्याही खासदाराला मूर्ख म्हटलेले नाही. जर 'भक्त' हा शब्द वापरण्याचा अधिकार फक्त भाजपलाच असेल, तर मी शांत बसतो."

यावेळी राहुल गांधी यांनी शिक्षण व्यवस्थेवरही टीका केली. गरीब विद्यार्थी तासनतास अभ्यास करतात, पण पेपरफुटीमुळे त्यांच्यावर अन्याय होतो, तर श्रीमंत विद्यार्थी लाखो रुपये देऊन पेपर मिळवतात, असा आरोप त्यांनी केला. शिक्षण व्यवस्थेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रभाव वाढल्याचा दावा करत, विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र्य नसल्याचंही त्यांनी म्हटलं.

तसेच, विद्यार्थी आंदोलनादरम्यान पेलेट गनचा वापर झाल्याचा मुद्दा उपस्थित करत, सुरक्षा दलांची कारवाई सरकारच्या आदेशाशिवाय होत नसल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. या विधानानंतरही भाजप खासदारांनी जोरदार गोंधळ घातला. त्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधींना संसदीय मर्यादांचे पालन करण्याचा इशारा दिला. यावर राहुल गांधी यांनी माझा माईक तरी चालू करा, मला बोलू द्या, अशी मागणी केली. या संपूर्ण घडामोडींमुळे काही काळ लोकसभेचे कामकाज गोंधळात पार पडले.