तुकाराम मुंढेंच्या नावाचा गैरवापर! बनावट FDA अधिकारी बनून स्वीट मार्ट मालकाकडून 6 लाखांची खंडणी

तुकाराम मुंढेंच्या नावाचा गैरवापर! बनावट FDA अधिकारी बनून स्वीट मार्ट मालकाकडून 6 लाखांची खंडणी

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात सुरू असलेल्या अन्न व औषध प्रशासनाच्या धडक कारवायांचा गैरफायदा घेत काही भामट्यांनी थेट एफडीए अधिकारी असल्याची बतावणी करत एका स्वीट मार्ट मालकाकडून तब्बल सहा लाख रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

वसईतील या प्रकरणात विजय जाधव, स्वाती तुळसकर, तेजस राठोड आणि त्यांच्या एका साथीदाराविरोधात माणिकपूर पोलीस ठाण्यात फसवणूक, खंडणी आणि बनावट सरकारी अधिकारी बनून धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी दोघांना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

तक्रारदार रोहित सुखडिया यांच्या म्हणण्यानुसार, 23 जून रोजी आरोपी त्यांच्या स्वीट मार्टमध्ये आले. त्यांनी स्वतःला एफडीए अधिकारी असल्याचे सांगत दुकानातील खाद्यपदार्थ आणि मुदतबाह्य वस्तूंवर कारवाई करण्याची धमकी दिली. दुकान सील करणे, गुन्हा दाखल करणे आणि माध्यमांमध्ये बदनामी करण्याची भीती दाखवत सुरुवातीला 12 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. अखेर तडजोडीअंती सहा लाख रुपये घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभर भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात कठोर मोहीम सुरू केल्यानंतर अशा कारवायांना वेग आला आहे. मात्र, त्याचाच गैरफायदा घेत काही जण बनावट अधिकारी बनून व्यावसायिकांची फसवणूक करत असल्याचे या घटनेतून समोर आले आहे.

विशेष म्हणजे, विजय जाधव आणि स्वाती तुळसकर यांच्याविरोधात यापूर्वीही बोरीवलीतील एका हॉटेल व्यावसायिकाची अशाच प्रकारे फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली असून माणिकपूर पोलीस या रॅकेटचा सखोल तपास करत आहेत.