‘एकनाथ शिंदे साहेबांना पळायलाही जागा राहिली नसती’; परभणी दौऱ्यावरून मनोज जरांगे पाटलांचा मोठा दावा
मुंबई (प्रतिनिधी) : परभणीमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आल्याने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी त्याला कडाडून विरोध केला होता. ओबीसी प्रमाणपत्राच्या मागणीसाठी उपोषण सुरू असतानाच हा मेळावा आयोजित करण्यात आल्याने आपण स्वतः तिथे जाणार असल्याचा इरादाही जरांगे पाटील यांनी व्यक्त केला होता.मात्र, नंतर परभणीच्या सीमा बंद करण्यात आल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी तिथे जाणं टाळलं आणि हा कार्यक्रम सुरळीतपणे पार पडला. मात्र, आता याच कार्यक्रमावरून मनोज जरांगे पाटील यांनी मोठा दावा केला आहे.

आपण विरोध केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपला दौरा रद्द केला होता. मात्र, पुन्हा 10 मिनिटांमध्ये कोणत्यातरी अधिकाऱ्याने ‘जरांगे पाटलांनी सूट दिली आहे’, असा मेसेज दिल्याने ते परभणीला आल्याचा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला.ते म्हणाले की, "आम्ही जर भिडलो असतो तर एकनाथ शिंदे साहेबांना पळायला सुद्धा जागा राहिली नसती," असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
दुसरीकडे, सरकारकडून आपल्यासोबत कोणत्याही प्रकारची चर्चा सुरू नसल्याचंही मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. ते म्हणाले की, "आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम आहोत आणि मुंबईला जाण्याचा सुद्धा निर्धार केला आहे."मुंबईच्या निर्णयाबाबत बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, "मी उपोषण करतच असून याच स्थितीमध्ये मुंबईला जाणार आहे. अंतरवाली सराटीमध्ये गर्दी करू नका, हळूहळू मुंबईकडे जा," असं आवाहन त्यांनी समर्थकांना केलं.
"50 लाख पोरं पुढे गेले तरी चालतील," असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. कल्याण, भिवंडी आणि पनवेल या भागात मराठवाड्यातील आपली मोठी संख्या असल्याचं त्यांनी सांगितलं.सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी केल्यानंतरच तोडगा निघेल, अशी भूमिकाही मनोज जरांगे पाटील यांनी मांडली आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री यांच्या सभांवरूनही जरांगे पाटील यांनी टोला लगावला. ते म्हणाले की, "शिंदेंच्या लाखांमध्ये सभा होत होत्या, मुख्यमंत्र्यांपेक्षा जास्त सभा होत होत्या; मात्र हे कुठं नेऊन ठेवलं आहे? मराठ्यांच्या विरोधामध्ये गेल्यावरती काय होतं, एक प्रकारे राजकीय अवकळा आली असल्याचा," असा टोला मनोज जरांगे पाटील यांनी लगावला आहे.




