‘आम्ही मुंबईला जाण्याची तयारी करतोय’; मराठा समाजाने 12 सप्टेंबरपर्यंत मुंबईला जा, मनोज जरांगेंची मोठी घोषणा
मुंबई (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. मात्र, सरकारच्या अधिकृत शिष्टमंडळाची प्रतीक्षा अद्याप कायम आहे. उपोषणाचा तिसरा दिवस उजाडला तरी सरकारकडून कोणतीही ठोस चर्चा झालेली नसल्याने मनोज जरांगे पाटील यांनी आता मराठा समाजाला मुंबईकडे कूच करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, "आम्ही मुंबईला जायची तयारी करतोय. मराठा समाजाला सांगतो, 12 सप्टेंबरपर्यंत हळूहळू मुंबईला जा. आपल्या सोयीनुसार तिथे राहा, फक्त आझाद मैदानावर जाऊ नका. मराठे मुंबईत आलेले त्यांना कळले नाही पाहिजे. पाहुणे, मित्र यांच्याकडे राहा. पोलिसांनी तुम्हाला जर उचलून नेले तर बिनधास्त पोलीस स्टेशनला जा, उलट तिथे चांगली सोय होते."
"उपोषण सोडणार नाही, मी बरोबर मुंबईत जातो," अशी घोषणाही मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की, "सगळे सोबत जाणे शक्य नाही. सरकारकडून कोणीही संपर्क साधलेला नाही. आमचे 12 तारखेला ठरल्यावर जाणार. गणेशोत्सव आपला आहे. आम्ही 11 दिवस गणपती बसवतो, ते दीड दिवस बसवतात आणि ते आम्हाला देव-देव शिकवतात. आमच्या एवढं पुण्य कोण करतं," असंही त्यांनी म्हटलं.
मंत्री उदय सामंत यांच्या संभाव्य दौऱ्यावर आणि सरकारच्या संपर्काबाबत प्रतिक्रिया देताना जरांगे पुढे म्हणाले, "24 तासात संपर्क साधू म्हणजे पावसासारखं आहे का? हळूहळू सरी पडणार. पोरांनो, आपले मुंबईचे सुरू करा," असे आवाहन त्यांनी केले.दरम्यान, परभणीचे खासदार संजय (बंडू) जाधव यांनी रविवारी, 30 ऑगस्ट रोजी आयोजित केलेला शेतकरी मेळावा रद्द करण्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता. मात्र, तरीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडला.
याबाबत विचारले असता मनोज जरांगे पाटील म्हणाले की, "एकनाथ शिंदे यांनी दौरा रद्द केला होता. पुन्हा 10 मिनिटांनी कोणत्या तरी अधिकाऱ्यांनी जरांगे पाटलांनी सूट दिली असा मॅसेज त्यांना दिला. त्यामुळे ते आले.""आम्ही भिडलो असतो तर एकनाथ शिंदे साहेबांना पळायला सुद्धा जागा राहिली नसती," असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला.




